Selena Gomez Cries Over Immigration Crackdown: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी नुकतीच राष्ट्राध्यक्षपदाची शपथ घेतली. सत्तेत येताच डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेत राहणाऱ्या बेकायदेशीर स्थलांतरितांवर कडक कारवाई केली आहे. अमेरिकेत राहणाऱ्या बेकायदेशीर स्थलांतरितांना देशाबाहेर काढण्याची घोषणा केली आहे. डोनाल्ड ट्रम्प यांच्या या निर्णयानंतर सुप्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सेलेना गोमेझनं (Selena Gomez) एक व्हिडीओ पोस्ट केला. ज्यामध्ये ती ढसाढसा रडताना दिसली. पण, त्यानंतर काही क्षणातच तिने तो व्हिडीओ डिलिट केला.
सेलेना गोमेझनं व्हिडीओ डिलिट केला असला, तरी तो तिच्या एका फॅन पेज X वर (पूर्वीचे ट्विटर) अद्याप आहे. या व्हिडीओमध्ये तिनं "I’m sorry' असं कॅप्शन दिलं आणि मेक्सिकोच्या ध्वजाचा स्टिकरही लावला होता. व्हिडीओत रडत-रडत ती म्हणते, "मला फक्त एवढंच सांगायचंय की मला खूप वाईट वाटतंय. माझ्या लोकांवर हल्ले होत आहेत, अगदी लहान मुलांवरही. मला हे समजत नाहीये. मला माफ करा. मी काही करू शकत नाहीये, पण मला काहीतरी करायचं आहे. मी यासाठी काहीतरी करण्याचा सर्वतोपरी प्रयत्न करेन, हे मी वचन देते".
सेलेनच्या या व्हिडीओवर संमिश्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत. काहींनी सेलेनाला पाठिंबा दिलाय. तर काही लोकांनी मात्र तिच्यावर टीका केली आहे. एका युजरनं लिहलं, "कायदा मोडून देशात राहणाऱ्या अशा लोकांना ती का पाठिंबा देत आहे?". तर एकाने लिहलं, "हे ट्रम्प यांचे फक्त मेक्सिकन आणि लॅटिन लोकांविरोधी धोरण नाही. हा अमेरिकेचा कायदा आहे, जो बेकायदेशीर मार्गाने देशात प्रवेश करणाऱ्यांविरोधात आहे". या व्हिडीओनंतर होणाऱ्या टीकेवर उत्तर देत सेलेनानं इंस्टाग्राम स्टोरीवर लिहिलं, "लोकांबद्दल सहानुभूती दाखवणे स्पष्टपणे ठीक नाही".
सेलेना गोमेझ ही एक अमेरिकन आहे. पण, तिच्या वडिलांचे आई आणि वडील म्हणजे तिचे आजी-आजोबा हे मेक्सिकोतून अमिरेकेत आले होते. सेलेनाच्या वडिलांचा जन्म अमिरकेतेच झाला होता. याबद्दल ऑक्टोबर २०१९ मध्ये टाइम मासिकाच्या एका लेखात सेलेना गोमेझने खुलासा केला होता. सेलेनाची आई Mandy Teefey या अमिरेकन आहेत. आई-वडील वेगळे झाल्यानंतर सेलेना तिच्या आईसोबत वाढली आहे.