नवी दिल्ली: क्रूझ शिपवरील ड्रग्ज प्रकरणात अटकेत असलेल्या आर्यन खानच्या अडचणी वाढल्या आहेत. चार दिवसांपूर्वी एनसीबीनं क्रूझवर धाड टाकून आठ जणांना अटक केली. त्यात आर्यन खानचा समावेश आहे. आर्यनचा जामीन अर्ज किल्ला कोर्टानं दोनदा फेटाळला आहे. त्यामुळे त्याचा तुरुंगातील मुक्काम वाढला आहे. वडील शाहरुख खान आणि आई गौरी खान आर्यनच्या सुटकेसाठी प्रयत्न करत आहेत. आज गौरी खानचा वाढदिवस आहे. तिच्या वाढदिवशीच कोर्टानं आर्यनचा जामीन अर्ज फेटाळला. त्यानंतर गौरी खानला अश्रू अनावर झाले.
काही दिवसांपूर्वीच आर्यनचा जामीन अर्ज किल्ला कोर्टानं फेटाळला. त्यानंतर आज जामीन अर्जावर सुनावणी झाली. त्यातही आर्यनला धक्का बसला. त्यानंतर आता गौरीचा एक व्हिडीओ समोर आला आहे. त्यात आर्यनला एनसीबीचे अधिकारी कोर्टाबाहेर आणताना दिसत आहेत. समोर एक कार उभी आहे. त्यात गौरी खान रडताना दिसत आहेत.
बॉलिवूडशी संबंधित वृत्त देणाऱ्या एका पेजनं फेसबुकवर गौरीचा व्हिडीओ शेअर केला आहे. यात गौरी पांढरा शर्ट आणि निळ्या जीन्समध्ये दिसत आहे. गौरीच्या भावनांचा बांध फुटल्यानं ती ढसाढसा रडताना दिसत आहे. गौरीच्या कारचा चालक वारंवार तिच्याकडे पाहत आहे. थोड्याच वेळात एक महिला कारमध्ये बसते. त्यानंतर कार निघून जाते.