Join us

"हीच माऊलींची सेवा" म्हणत अभिनेत्याचं आवाहन, अनाथ व आदिवासी मुलांसाठी मागितली मदत!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 6, 2025 16:40 IST

मराठी अभिनेत्यानं मित्राच्या समाजोपयोगी कार्याचा उल्लेख करत एक भावनिक पोस्ट लिहिली आहे.

आषाढी एकादशी म्हणजे भक्ती, श्रद्धा आणि सेवा यांचा संगम. विठोबाचा आशिर्वाद मिळवण्यासाठी भक्त आपापल्या पद्धतीने सेवा करतात.  काहीजण पंढरपूर वारीला निघतात, तर काहीजण समाजसेवेच्या माध्यमातून आपली श्रद्धा व्यक्त करतात. भक्ती म्हणजे केवळ देवळात डोके टेकवणं नाही, तर समाजातील दुर्बलांचा आधार होणं, हीच खरी विठ्ठलसेवा. आषाढी एकादशीच्या निमित्ताने मराठी अभिनेता संतोष जुवेकर यानं आपल्या मित्राच्या समाजोपयोगी कार्याचा उल्लेख करत एक भावनिक पोस्ट लिहिली आहे.

आषाढी एकादशीच्या पवित्र दिवशी त्यानं 'सेवाच खरा धर्म' हा संदेश देत समाजातील दुर्लक्षित मुलांसाठी मदतीचे आवाहन केलं आहे.  संतोष जुवेकरनं या पोस्टमध्ये आपल्या मित्र ईश्वर काळेच्या कार्याची माहिती दिली आहे.  त्यानं लिहलं, "मित्रांनो आमचा एक मित्र आहे. ईश्वर काळे जो बरडगाव, D T जिल्हा कर्जत,  अहमदनगर येथे काही आदिवासी गरीब मुलांसाठी आणि काही अनाथ मुलांसाठी शाळा चालवतो आणि त्या मुलांना राहण्यासाठी त्यांच्या निवाऱ्याची सोय सुद्धा तोच करतो. अगदी स्वतःच्या पोटच्या पोरांसारखं त्यांना सांभाळतो आणि त्याच्या या महान कर्तव्यात आम्ही त्याचे काही मित्र त्याला फुल ना फुलाची पाकळी म्हणून हातभार लावण्याचा प्रयत्न करत असतो".

पुढे त्यानं लिहलं, "सध्या माझ्या या मित्राला त्याच्या पोरांच्या पोटाच्या भुकेच्या काळजीन थोडं टेन्शन आलेय. शिवाय पावसाचे दिवस आहेत, राशनची कमतरता आहे. मी आणि माझे मित्र आम्ही आमच्या परीने जसं आणि जेवढ जमेल तेवढं करण्याचा प्रयत्न करतोच आहोत. त्यात तुम्ही सुद्धा तुमच्या परीने हातभार लावलात तर आपला मित्र आणि त्याची पोरं निर्धास्त होतील आणि त्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसेल. मला वाटतं ह्या आषाढीएकादशी निमित्ताने हीच माऊलींची सेवा केल्यासारखं आहे. राम कृष्ण हरी",  असं म्हणतं संतोष जुवेकरनं मदतीचं आवाहन केलंय. अभिनेत्यानं संबंधित शाळेचे नाव आणि इतर माहिती पोस्टमध्ये नमुद केली आहे. 

टॅग्स :संतोष जुवेकरआषाढी एकादशी २०२५सेलिब्रिटी