Salman Khan : बॉलिवूडचा 'दबंग' सलमान खानचे चाहते त्याच्या धमाकेदार पुनरागमनाची वाट पाहत आहेत. येत्या ईद २०२५ मध्ये सलमान खान बॉक्स ऑफिसवर मोठा धमाका करण्याच्या तयारीत आहे. आता सलमान खानने त्याच्या चाहत्यांना एक भेट दिली आहे. सलमानने 'सिकंदर'चा धमाकेदार टीझर (Sikandar Teaser) शेअर केला आहे. हा टीझर सोशल मीडियावर व्हायरल झाला असून सर्वत्र त्याचीच चर्चा आहे.
खरं तर 'सिंकदर' सिनेमाचा टीझर सलमानच्या वाढदिवशी म्हणजेच २७ डिसेंबर २०२४ ला प्रदर्शित होणार होता. पण माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्या निधनामुळे टीझरचे प्रदर्शन पुढे गेले होते. आता सलमानचा 'सिकंदर' सिनेमाचा टीझर प्रदर्शित झालाय. सलमान खान ॲक्शन अवतारात टीझरमध्ये दिसतोय. टीझरच्या सुरुवातीला सैनिकांचे पुतळे असलेल्या एका रहस्यमय ठिकाणी सलमान चालताना दिसतोय. तेवढ्यात त्या पुतळ्यात लपलेले मारेकरी सलमानवर हल्ला करण्यासाठी पुढे येतात. यावेळी पाठमोरा उभा असलेला सलमान मागे वळताना म्हणतो "सुना है की बहोत सारे लोग मेरे पीछे पडे है…बस्स…मेरे मुड़ने की देर है".
या टीझरमध्ये सलमान हा हल्लेखोरांचा नायनाट करताना पाहायला मिळतो. तसेच टीझरमध्ये पुतळ्यात लपलेल्या मारेकऱ्याच्या डोक्यावरील टोपवर काळवीटाच्या शिंगांसारखे डिझाईन दिसून येत आहे. यातून सलमानने थेट गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईला इशारा दिल्याचा अंदाज चाहत्यांना बांधला आहे. हा टीझर पाहूनच चाहते आता सिनेमाची कथा काय असेल, हे जाणून घेण्यासाठी उत्सुक झाले आहेत.
'सिंकदर' सिनेमात बाहुबली फेम अभिनेता सत्यराजने खलनायकाची भूमिका साकारली आहे. तर सलमानसोबत रश्मिका मंदान्ना मुख्य भूमिकेत आहेत. त्याचबरोबर सत्यराज, प्रतीक बब्बर, काजल अग्रवाल आणि शर्मन जोशी यांच्याही मुख्य भूमिका आहेत. या सिनेमाचे दिग्दर्शन ए आर मुरगूदास यांनी केले असून त्यांचा अॅक्शन सिनेमात हातखंडा आहे. तर या चित्रपटाची निर्मिती साजिद नाडियादवाला यांनी केली आहे. हा सिनेमा २०२५ मध्ये ईदला प्रदर्शित होणार आहे.