Join us
Daily Top 2Weekly Top 5

भर रस्त्यात सखी गोखलेचा आशय कुलकर्णीसह डान्स, नेटकरी म्हणाले- "मागून पोर्शे कार आली तर..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 21, 2024 13:39 IST

आमिर खान आणि करीना कपूरच्या झुबी डुबी या थ्री इडियट्स सिनेमातील गाण्यावर सखी आणि आशयने डान्स केला आहे. त्यांच्या या व्हिडिओने चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. 

'दिल दोस्ती दुनियादारी' मालिकेतून अभिनेत्री सखी गोखले घराघरात पोहोचली. आईवडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत सखीनेदेखील अभिनयातच करिअर करणं पसंत केलं. सखी एक उत्तम अभिनेत्री आहे. 'दिल दोस्ती दुनियादारी' या मालिकेतून तिने अभिनयात पदार्पण केलं होतं. या मालिकेत तिने साकारलेली रेश्मा ही भूमिका चाहत्यांच्या पसंतीस उतरली. पहिल्याच मालिकेने सखीला लोकप्रियता मिळवून दिली. त्यानंतर अनेक सिनेमांमध्ये ती दिसली. 

सखी सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय असल्याचं पाहायला मिळतं. अनेकदा ती नवीन प्रोजेक्टबरोबरच वैयक्तिक आयुष्यातील अपडेटही चाहत्यांना देत असते. सखी अनेकदा तिचे फोटो आणि व्हिडिओही शेअर करत असते. नुकतंच तिने एक रील व्हिडिओ इन्स्टाग्रामवरुन शेअर केला आहे. या व्हिडिओत सखी अभिनेता आशय कुलकर्णीसह भर रस्त्यात डान्स करताना दिसत आहे. आमिर खान आणि करीना कपूरच्या झुबी डुबी या थ्री इडियट्स सिनेमातील गाण्यावर सखी आणि आशयने डान्स केला आहे. त्यांच्या या व्हिडिओने चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. 

या व्हिडिओत सखी आणि आशय झुबी डुबी गाण्याच्या हुक स्टेप्सही करताना दिसत आहेत. त्यांचा हा व्हिडिओ चाहत्यांच्या पसंतीस उतरला आहे. "पाऊस, शहरातील मोकळे रस्ते, मजेशीर कंपनी आणि थोडं झुबी डुबी", असं कॅप्शन तिने व्हिडिओला दिलं आहे. या व्हिडिओवर चाहत्यांनी मजेशीर कमेंटही केल्या आहेत. "मागून पोर्शे कार आली तर", "मला वाटलं हा सुव्रतच आहे, पण छान होतं", "आशय आणि सुव्रत दोघे पण सारखेच दिसतात", "सुजय Jealous झाला असेल", अशा कमेंट चाहत्यांनी केल्या आहेत. 

दरम्यान, सखीप्रमाणेच आशयदेखील लोकप्रिय अभिनेता आहे. 'पाहिले न मी तुला' या मालिकेमुळे तो प्रसिद्धीझोतात आला. त्याने 'मुरांबा', 'माझा होशील ना' या मालिकांमध्येही काम केलं आहे. 'व्हिक्टोरीया', 'डबल सीट' या सिनेमांतही आशय कुलकर्णी महत्त्वाच्या भूमिका साकारताना दिसला. 

टॅग्स :सखी गोखलेटिव्ही कलाकारमराठी अभिनेता