Saif Ali Khan News Marathi: बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानवर हल्ला करणाऱ्या आरोपीच्या चौकशीतून नवनवी माहिती समोर येत आहे. आरोपी मोहम्मद शरीफूल इस्लाम शहजाद हा हल्ल्याच्या घटनेनंतर तीन-चार दिवस का फिरत होता, याचीही माहिती त्याने पोलिसांना दिली.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
सैफ अली खानवर हल्ल्या केल्यानंतर आरोपी त्या इमारतीच्या बागेतच दोन तास लपून बसला होता. आरोपी मोहम्मद शरीफूल इस्लाम शहजादने पश्चिम बंगाल मार्गे बांगलादेशमध्ये पळून जाण्याचा प्लॅन केला होता.
मुंबईतून पश्चिम बंगालला जाण्यासाठी तो रेल्वे स्टेशनवर गेला. पण, त्याला हावडाला जाण्यासाठी तिकीट मिळाले नाही. त्यानंतर तो रेल्वे तिकीट एजंटचा शोध घेत फिरला.
फोटो आला आणि मोहम्मद शरीफूल इस्लाम शहजाद अडकला
हल्ल्याच्या घटनेनंतर आरोपीचा टीव्ही चॅनेल आणि वृत्तपत्रांमध्ये फोटो छापून आले. त्यामुळे त्याला मुंबईत फिरणं अवघड झालं होतं. मुंबईतून कसातरी त्याने पळ काढला आणि ठाण्याला पोहोचला. पण, मागावर असलेल्या पोलिसांना त्यांचे ठिकाण कळले.
जेहच्या खोलीत सापडली आरोपीची टोपी
ज्यावेळी आरोपी मोहम्मद शरीफूल इस्लाम शहजाद सैफ अली खानच्या घरात शिरला. त्यावेळी तो सैफचा छोटा मुलगा जेहच्या खोलीत गेला होता. त्यावेळी झालेल्या झटापटीत आरोपीची टोपी त्या खोलीत पडली.
त्या खोलीत पडलेली टोपी आणि आरोपीचे केस आता डीएनए चाचणीसाठी स्कूल ऑफ फॉरेन्सिक लॅबमध्ये पाठवण्यात आले आहेत. पोलिसांना सैफच्या घरात वेगवेगळ्या ठिकाणी आरोपीचे १९ बोटांचे ठसे आढळून आले आहेत.