Supriya Sule On Saif Ali Khan: बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानवरील चाकू हल्ल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. सैफ अली खान आणि करीना कपूर यांच्या वांद्रे येथील घरात ही घटना घडली. मध्यरात्री चोरट्याने घरात घुसून हल्ला केला. त्याने सैफ अली खानवर चाकूने अनेक वार करून जखमी केलं. सध्या सैफ अली खान सध्या मुंबईतील लीलावती रुग्णालयात दाखल आहे. सैफवर शस्त्रक्रिया करण्यात आली असून त्याची प्रकृती सध्या स्थिर आहे. आता सैफ आणि त्याच्या घराच्या सुरक्षेबाबत बरेच प्रश्न उपस्थित होत आहेत. या घटनेची माहिती मिळताच राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी ( Supriya Sule Called Karishma Kapoor ) अभिनेत्री आणि करीना कपूरची बहिण करिश्मा कपूरला फोन करत चौकशी केली.
सैफ अली खानवर हल्ला झालेला कळताच सुप्रिया यांनी करिश्मासोबत फोनवर संवाद साधला. सुप्रिया यांनी प्रसारमाध्यमांसमोरचं करिश्मला फोन लावला. यावेळी करिश्माने फोन उचलाताच सुप्रिया यांनी, "हॅलो लोलो ऑल ओके? काय झालं? असे प्रश्न केले. तर तिकडून करिश्मानं संपुर्ण घटनाक्रम सांगितला. सुप्रिया पुढे म्हणाल्या, करीना आता रुग्णालयात आहे का? किती धक्कादायक घटना आहे. आई-वडिलांना (रणधीर कपूर-बबीता कपूर) इतक्या काही सांगू नकोस".
सुप्रिया सुळे म्हणाल्या, "मी काही करु की पोलिसांना तुम्ही तक्रार केली आहे आणि ते आले आहेत. मला खरंच माफ कर मी तुला इतक्या सकाळी फोन केला. मी माझ्या मतदारसंघात एका कार्यक्रमासाठी आले होते, तेव्हा मला समजलं. यानंतर मी सैफला फोन केला, त्यानंतर मी तुमच्या कुटुंबाला फोन केला पण कोणीही उचलला नाही. त्यामुळे मी तुला फोन केला. तो घरात कसा शिरला, किती धक्कादायक आहे. सैफ आणि करीनाची काळजी घे आणि मला काय होतंय ते कळवं. माझी काही मदत लागली तर तेही सांग. खूप खूप प्रेम, काळजी घ्या”, असं सुप्रिया सुळेंनी म्हटले.
यानंतर सुप्रिया सुळेंनी प्रसारमाध्यांशी संवाद साधला. "मला वाटतं जी घटना घडली आहे, त्याबद्दल पोलिस काय सांगतात, त्याची वाट पाहूया. त्याच्या कुटुंबाची गोपनियता महत्त्वाची आहे. त्यांच्याकडून लवकरच अधिकृत पत्रक काढलं जाईल. याबद्दल अधिकृतरित्या सविस्तर माहिती आल्यानंतर बोलणं योग्य ठरेल".