हिंदी सिनेसृष्टीतील सर्वात सुंदर आणि प्रतिभावान अभिनेत्री म्हणून आजही मधुबालाचं (Madhubala) नाव घेतलं जातं. मधुबालासारखं सोंदर्य अशी उपमा आजही दिली जाते. मराठी अभिनेते सचिन पिळगावकर (Sachin Pilgaonkar) यांना लहानपणी मधुबालाला भेटण्याची संधी मिळाली होती. तेव्हा ते ७ वर्षांचे होते. सचिन पिळगावकर यांनी तो किस्सा सांगितला आहे. यावेळी त्यांनी मधुबालाचा 'मधु आँटी' असा उल्लेख केला आहे.
सचिन पिळगावकर यांनी पहिल्यांदा कोणाचा ऑटोग्राफ घेतला होता? या प्रश्नावर रेडिओ सिटी मराठीला दिलेल्या मुलाखतीत सचिन पिळगावकर म्हणाले, "मी पहिला ऑटोग्राफ घेतला तेव्हा मी फारच लहान होतो. ७ वर्षांचा असेन. राजकमल स्टुडिओमध्ये शूटिंगसाठी मी निघालो. माझ्यासोबत शाळेची वही होती. मी टॅक्सीतून खाली उतरलो आणि थोडं दूर बघितलं बाहेर मधु आँटी उभी आहे. म्हणजे मधुबाला. मी तिला बघताच इतका खूश झालो. आमची खूप जवळीक होती. आम्ही कधी सोबत काम केलं नव्हतं पण मी तिला पाहताच 'मधु आँटीSSS' अशी हाक मारत पळालो. तिने माझ्याकडे बघितलं आणि तिने हात पसरले. तिने मला मिठी मारली. मग मी म्हणालो, 'एक मिनिट, मला ऑटोग्राफ हवा' असं म्हणत मी वही-पेन काढलं.' ती म्हणाली, 'तुला हवाय माझा ऑटोग्राफ?'. मी म्हणालो, 'हो द्या ना.'
ती ऑटोग्राफ देत असताना मी असंच खाली पाहिलं. मला त्या बाईचे पाय दिसले. ती बाई जितकी सुंदर होती ना त्याच्या दस पटीने तिचे पाय सुंदर होते. असे पाय मी आयुष्यात कधी बघितले नाही. इतके सुंदर...बापरे बाप. मी पाहतच राहिलो. मग तिने माझी विचारपूस केली. लंच ब्रेकला ती आली आणि आम्ही एकत्र जेवलो. पण तो माझा आयुष्यातला पहिला मी घेतलेला ऑटोग्राफ होता.
सचिन पिळगावकर सध्या सोशल मीडियावर त्यांच्या अनेक वक्तव्यांमुळे ट्रोल होत आहेत. त्यातच आता त्यांची ही मुलाखतही व्हायरल होत आहे. या ट्रोलिंगवर अद्याप त्यांनी स्पष्टीकरण दिलेलं नाही.