Join us
Daily Top 2Weekly Top 5

मालेगाव अत्याचार घटनेवर रुचिरा जाधवचा संताप, म्हणाली "महाराजांच्या भूमीत एका चिमुरडीवर..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 19, 2025 11:49 IST

मालेगावमधील चिमुरडीवर अत्याचार, निर्घृण हत्या! घटनेवर अभिनेत्री रुचिरा जाधवचा संताप; म्हणाली "न्याय हवा"

Nashik Malegaon Crime News: नाशिकच्या  मालेगाव तालुक्यातील डोंगराळे गावात चिमुरडीवर अत्याचार करून तिची निर्घृण हत्या केल्याची हादरवून टाकणारी घटना उघडकीस आली आहे. १६ नोव्हेंबर रोजी गावातील २४ वर्षीय विजय संजय खैरनर याने या चिमुरडीवर प्रथम अत्याचार केला आणि नंतर तिचे डोके दगडाने ठेचून हत्या केल्याची माहिती समोर आली आहे.  घटनेची माहिती मिळताच मालेगाव तालुका पोलीसांनी विजय खैरनार याला ताब्यात घेतले. या घटनेने राज्यात तीव्र संतापाची लाट पसरली आहे. या घटनेबाबत मराठी अभिनेत्री रुचिरा जाधव हिने संताप व्यक्त केला आहे.

रुचिरा जाधवने या प्रकरणी एक व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यात ती म्हणाली, "नमस्कार... सोशल मीडियावर जे काही मी बघतेय, ज्या काही बातम्या, व्हिडीओ येत आहेत. मालेगावमध्ये जे काही घडलंय, जी घटना घडलीय, घटना हा फार साधा शब्द आहे त्यापुढे... त्याबद्दल मी आज बोलतेय. ४ वर्षांची मुलगी... या गोष्टीचं जोपर्यंत आपण मूळ शोधत नाही आणि त्या गोष्टीच्या मुळापर्यंत जाऊन आपण काहीच करणार नाही, तोपर्यंत हे होत राहणार. आता आपण या घटनेबद्दल वाचणार, प्रतिक्रिया देणार, हळहळ व्यक्त करणार, बापरे म्हणणार, पण, पुढे काहीच नाही होणार. उद्यापासून मी माझ्या कामाला लागणार, तुम्ही तुमच्या कामाला लागणार. पण, या गोष्टीचं मूळ जोपर्यंत सापडत नाही, तोपर्यंत आपण काहीच करू शकत नाही. जर या मुलीला न्याय मिळाला नाही, तर एक समाज म्हणून आपण नापास आहोत. पूर्णपणे नापास आहोत".

या गुन्ह्यामागे समाजाची 'मानसिकता' जबाबदार असल्याचे रुचिराने ठामपणे सांगितले. या मानसिकतेवर बोलताना तिने कपड्यांवर दोष देण्याच्या प्रवृत्तीवर कडक टीका केली. ती म्हणाली, "जेव्हा महिला म्हणजे आम्ही आमच्या हक्काबद्दल बोलतो, मी एक अभिनेत्री आहे, तर कधी मुलाखतीमध्ये मी व्यक्त होत असते. त्या मुलाखतीमधील एक ओळ पकडून त्यावर दहा कमेंट केल्या जातात. आता तुम्ही म्हणाल या गोष्टी संलग्न कशा आहेत? तर मानसिकता. समाजाची मानसिकता हीच खरी समस्या आहे. मला सांगा या मुलीने वाईट कपडे घातले होते का? आता कपड्यांना दोष देता येणार नाही. आता काय कराल? ४ वर्षांची मुलगी होती ती… आता कोणाला दोष द्याल? प्रत्येकवेळी तेच कारण नसू शकतं".

पुढे तिनं म्हटलं, "मी हे म्हणणार नाही की जगात जे चालूये ते सगळंच चांगलंच सुरूये... सगळ्याच मुली अगदी बरोबर आहेत. दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. पण, जेव्हा अशा गोष्टी होतात तेव्हा इतर गोष्टींकडे लक्ष न देता आपण प्रत्येक गोष्टीचं मूळ शोधलं पाहिजे. मी आज व्यक्त झाले नाही तर एक स्त्री म्हणून माझी मला लाज वाटेल. मला माहिती नाही की असं व्यक्त होणं किती योग्य आहे किती अयोग्य. पण नाही, हे फार क्रूर आहे, ही राक्षसी प्रवृत्ती आहे. ज्या महाराजांच्या भूमीत आपण राहतो. छत्रपती महाराजांच्या भूमीत जो न्याय होता, आज तिथे हे सगळं होतंय. हे विचित्र आहे. हे जर होत राहिलं तर विनाश फार लांब नाही. अजिबातच लांब नाही". 

छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात अशा घटना घडत असल्याबद्दल तिने खंत व्यक्त केली. ती म्हणाली, "आपल्या घरात महाराज असतात. तर ही वेळ आहे आता महाराजांना फक्त घरामध्येच नाही तर त्यांची तत्वे पाळावीत. त्यांचे आदर्श पाळण्याची आपली तेवढी पात्रता नसेल तर एक माणूस म्हणून अशा गुन्ह्यावर न्याय कसा झाला पाहिजे, हे तर कळतं.  माझी प्रशासनाला, सरकारला विनंती आहे की, प्लीज प्लीज…काहीतरी करा. आता न्याय हवाय!".

English
हिंदी सारांश
Web Title : Ruchira Jadhav outraged over Malegaon atrocity, says it's a disgrace

Web Summary : Actress Ruchira Jadhav expressed outrage over the Malegaon rape and murder of a 4-year-old girl. She condemned blaming clothes and urged society to address the root cause of such crimes, emphasizing the need for justice in Chhatrapati Shivaji Maharaj's land.
टॅग्स :मराठी अभिनेतानाशिकमालेगांव