Join us

पत्नीचा पाठीराखा! जेनेलियाच्या पहिल्या मराठी सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा रितेशच्या खांद्यावर

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 27, 2022 15:28 IST

Riteish Deshmukh: जवळपास २० वर्ष अभिनयाला प्राधान्य देणाऱ्या रितेशने पहिल्यांदाच दिग्दर्शकीय क्षेत्रात पदार्पण केलं आहे. एका मराठी चित्रपटाच्या माध्यमातून त्याने या क्षेत्रात पदार्पण करण्याचा निर्णय घेतला आहे.

महाराष्ट्राचा लाडका लेक या नावाने घराघरात पोहोचलेला अभिनेता म्हणजे रितेश देशमुख (Riteish Deshmukh). 'हे बेबी', 'धमाल', 'हाऊसफुल्ल','तेरे नाल लव हो गया' या आणि अशा असंख्य चित्रपटांमध्ये झळकलेला रितेश आज प्रेक्षकवर्गासाठी नवीन नाही. उत्तम अभिनयशैली आणि वागण्यातील नम्रपणा यामुळे आज रितेश लोकप्रिय अभिनेता म्हणून ओळखला जातो. जवळपास २० वर्ष अभिनयाला प्राधान्य देणाऱ्या रितेशने पहिल्यांदाच दिग्दर्शकीय क्षेत्रात पदार्पण केलं आहे. एका मराठी चित्रपटाच्या माध्यमातून त्याने या क्षेत्रात पदार्पण करण्याचा निर्णय घेतला आहे.

सोशल मीडियावर सक्रीय असणाऱ्या रितेशने नुकतंच एक ट्विट करुन त्याच्या आगामी चित्रपटाची घोषणा केली आहे. रितेश एका मराठी चित्रपटाच्या माध्यमातून दिग्दर्शकीय क्षेत्रात पदार्पण करत आहे. विशेष म्हणजे याच चित्रपटातून त्याची पत्नी जेनेलिया (Genelia Deshmukh) तब्बल १० वर्षांनंतर अभिनय क्षेत्रात कमबॅक करत आहे.

'वेड' (ved) या आगामी चित्रपटाचं दिग्दर्शन रितेश करणार असून या चित्रपटाची प्रस्तुती मुंबई फिल्म कंपनी करणार आहे. या चित्रपटात जेनेलिया महत्त्वपूर्ण भूमिका साकारत आहे. नुकताच या चित्रपटाचा मुहूर्त संपन्न झाला आहे. यावेळी जेनेलियाचा चित्रपटातील फर्स्ट लूकही समोर आला.

दरम्यान,  वेडच्या माध्यमातून रितेश पहिल्यांदाच दिग्दर्शकीय क्षेत्रात पदार्पण करतोय. तर जेनेलिया १० वर्षांनी अभिनय क्षेत्रात कमबॅक करतीये. त्यामुळे या चित्रपट दोघांसाठीही अत्यंत महत्त्वाचा आहे. या चित्रपटाविषयी सध्या इतकीच माहिती समोर आली आहे. त्यामुळे या चित्रपटाची कथा, कलाकार या सारख्या अनेक गोष्टी गुलदस्त्यात ठेवण्यात आल्या आहेत. 

टॅग्स :रितेश देशमुखसेलिब्रिटीजेनेलिया डिसूजासिनेमा