Join us

रितेश देशमुख अन् जिनिलियानं बाभळगावात बजावला मतदानाचा हक्क

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 20, 2024 12:40 IST

अभिनेता रितेश देशमुख आणि जिनिलिया देशमुख यांनी लातूरच्या बाभळगावात मतदानाचा हक्क बजावला आहे. 

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 साठी (Maharashtra Assembly Election 2024) आज (20 नोव्हेंबर) मतदान पार पडत आहे. संपूर्ण राज्यात एकाच टप्प्यात निवडणुका घेण्यात आहे. सकाळी 7 वाजेपासून मतदानाला सुरुवात झाली असून संध्याकाळी 6 वाजेपर्यंत मतदान करता येणार आहे. सिनेसृष्टीतील कलाकार आपल्या मतदानाचा हक्क बजावताना दिसत आहेत. त्याचे फोटो, व्हिडीओ व्हायरल झाले आहेत. अभिनेता रितेश देशमुख आणि जिनिलिया देशमुख यांनी लातूरच्या बाभळगावात मतदानाचा हक्क बजावला आहे. 

रितेश देशमुख आणि जिनिलिया यांनी लातूर विधानसभेसाठी मतदार केंद्रावर जाऊन मतदान केलं आहे. अगदी सामान्य व्यक्तीप्रमाणे रांगेत उभा राहून यावेळी त्यांनी मतदानाचा हक्क बजावला. यावेळी प्रत्येक नागरिकाला मतदान करण्याचं आवाहन या जोडीनं केलं आहे. लातूर विधानसभा मतदारसंघात रितेशचा भाऊ अमित देशमुख हे निवडणुकीच्या रिंगणात आहेत. अमित देशमुख यांना काँग्रेसकडून उमेदवारी देण्यात आली असून त्यांच्या प्रचारासाठी रितेश देशमुखने ठिकठिकाणी प्रचार केला होता. अमित देशमुख यांच्या प्रचारात रितेश देशमुखचा मोलाचा वाटा पाहायला मिळाला. 

अमित देशमुख यांच्याविरोधात  भाजपच्या डॉ. अर्चना पाटील चाकूरकर मैदानात आहेत. या मतदारसंघात काँग्रेसची चांगली ताकद आहे. 2019 मध्ये लातूर शहर विधानसभा मतदारसंघ हा भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने जिंकला होता. लातूर शहर हा महाराष्ट्र राज्यातील लातूर जिल्ह्यांतर्गत येतो. 2019 मध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे अमित विलासराव देशमुख यांनी भारतीय जनता पक्षाच्या शैलेश गोविंदकुमार लाहोटी यांचा 40415 मतांच्या फरकाने पराभव करून जागा जिंकली होती.दरम्यान, आज मतदान झाल्यानंतर येत्या 23 नोव्हेंबर रोजी मतमोजणी होणार आहे. तर त्याच दिवशी निकाल लागणार आहे. यानंतर राज्यात नवे सरकार स्थापन होईल.  

टॅग्स :रितेश देशमुखजेनेलिया डिसूजालातूरमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४