Join us

Punha Shivajiraje Bhosale Review: मराठी माणसाला जागं करणारे 'शिवाजीराजे भोसले पुन्हा' आलेत, पण यावेळी...; वाचा रिव्ह्यू

By देवेंद्र जाधव | Updated: October 31, 2025 10:24 IST

Punha Shivajiraje Bhosale Movie Review: महेश मांजरेकर दिग्दर्शिक 'पुन्हा शिवाजीराजे भोसले' थिएटरमध्ये पाहण्याचा विचार करताय? वाचा रिव्ह्यू

Release Date: October 31, 2025Language: मराठी
Cast: सिद्धार्थ बोडके, त्रिशा ठोसर, शशांक शेंडे, मंगेश देसाई,  सिद्धार्थ जाधव, विक्रम गायकवाड, सयाजी शिंदे, विजय निकम, पायल जाधव, रोहित माने
Producer: महेश मांजरेकर, राहुल पुराणिक, राहुल सुगंधDirector: महेश मांजरेकर
Duration: २ तास ४३ मिनिटेGenre:
लोकमत रेटिंग्स

Punha Shivajiraje Bhosale Movie Review: महेश मांजरेकरांच्या 'पुन्हा शिवाजीराजे भोसले' सिनेमाची गेल्या अनेक दिवसांपासून खूप चर्चा होती.  मांजरेकरांनी या सिनेमाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील सध्याच्या गंभीर परिस्थितीवर प्रकाश टाकला आहे. हा बहुचर्चित सिनेमा प्रेक्षकांच्या अपेक्षांवर खरा उतरला आहे का? जाणून घ्या

कथानक:शेतात घाम गाळून कुटुंबाचं पोट भरणारा एकनाथ हा सर्वसामान्य शेतकरी. वडील, बायको आणि दोन मुलांसोबत आयुष्य जगणाऱ्या एकनाथवर सावकाराचं कर्ज असतं. एकनाथची छोटी मुलगी रखमा खूप हुशार. एकदा शेतात काम करताना पोटात भयंकर कळ आल्याने एकनाथ खाली पडतो. पुढे मुलीचा हट्ट म्हणून तो तालुक्यातील डॉक्टरकडे जातो. परंतु तिथे गेल्यावर स्वतःच्या शारीरिक अवस्थेबद्दल त्याला धक्कादायक माहिती कळते.

एका बाजूला सावकाराचं कर्ज आणि दुसऱ्या बाजूला स्वतःच्याच दुखण्याचा वारेमाप खर्च, अशा दुहेरी संकटात तो सापडतो. अखेर बेजार होऊन एकनाथ टोकाचं पाऊल उचलून आत्महत्या करतो. वडिलांचं छत्र गमावलेली रखमा छत्रपती शिवरायांचा धावा करते. निरागस रखमाची आर्त हाक ऐकून शिवाजी महाराज तिच्या मदतीला धावून येतात. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची दयनीय अवस्था बघून महाराज अस्वस्थ होतात. पुढे शेतकऱ्यांचं दुःख नाहीसं करण्यासाठी शिवाजी महाराज कोणते उपाय करतात? पिळवणूक करणाऱ्या सावकारांना ते कसा धडा शिकवतात? याची कहाणी 'पुन्हा शिवाजीराजे भोसले' सिनेमात बघायला मिळते.

लेखन-दिग्दर्शनमहेश मांजरेकरांनी हा सिनेमा लिहिलाय आणि दिग्दर्शित केलाय. सिनेमाची सुरुवात वेगवान आहे. छत्रपती शिवरायांची दिमाखदार एन्ट्री बघायला मिळते. काही छोटे संवादही टाळ्या वसूल करतात. शेतकरी आत्महत्येचा गंभीर विषय पोहोचवण्यात मांजरेकर निश्चित यशस्वी झाले आहेत. सिनेमासाठी त्यांनी अनेक गोष्टींचा केलेला सखोल अभ्यास जाणवतो. परंतु काही प्रसंग उगाच ताणल्यासारखे वाटतात.

विशेषतः अॅक्शन दृश्य रोमांचक असले तरीही ते लांबवल्याने सिनेमाच्या मूळ विषयाचं गांभीर्य कमी होतं. उत्तरार्धात खलनायकाची पार्श्वभूमी दाखवण्यात सिनेमा बराच रेंगाळतो. काही ठिकाणी तांत्रिक चुकाही दिसतात. हितेश मोडक यांचं संगीत प्रसंग उठावदार करण्याचं काम करतं. परंतु सिनेमातील गाणी तितकी लक्षात राहत नाहीत. अभिनय: अभिनयाच्या बाबतीत सिद्धार्थ बोडकेने एकहाती सिनेमा स्वतःच्या खांद्यावर समर्थपणे पेलला आहे. आजवर छोट्या भूमिकांमध्ये दिसलेल्या सिद्धार्थला प्रथमच इतकी प्रभावी भूमिका साकारण्याची संधी मिळाली. छत्रपती शिवरायांंची भूमिका साकारण्याचं गांभीर्य सिद्धार्थच्या अभिनयात पुरेपूर जाणवतं. शेतकऱ्यांची शोकांतिका पाहून महाराजांची होत असणारी घुसमट, मनात धुमसत असलेला राग सिद्धार्थने उत्कृष्ट दाखवला आहे. सिद्धार्थची संवादफेक, त्याची मराठी भाषेवरील पकड अफलातून आहे.

 मंगेश देसाईंनी दिनकरची भूमिका चांगली रंगवली आहे. याशिवाय 'हास्यजत्रे'त खळखळून हसवणाऱ्या पृथ्वीक प्रतापला एकनाथच्या गंभीर भूमिकेत पाहणं एक सुखद धक्का आहे. नुकतीच राष्ट्रीय पुरस्काराची मानकरी ठरलेली बालकलाकार त्रिशा ठोसरने रखमाच्या भूमिकेत पुन्हा एकदा आत्मविश्वासाने काम केलंय. सिद्धार्थ जाधवने रंगवलेला खलनायक उस्मान त्याच्या आजवरच्या भूमिकांपेक्षा वेगळा आहे. सयाजी शिंदे, शशांक शेंडे, विक्रम गायकवाड, भार्गव जगताप, पायल जाधव हे कलाकारही त्यांच्या भूमिका चांगल्या निभावतात.सकारात्मक बाजू: सिनेमाचा विषय, कलाकारांचा अभिनयनकारात्मक बाजू: संथ गती, तांत्रिक चुका, संगीत आणि गाणीथोडक्यात काय तर, महेश मांजरेकरांनी १६ वर्षांनंतर 'पुन्हा शिवाजीराजे भोसले'च्या माध्यमातून महाराष्ट्रातील शेतकरी आत्महत्येचा गंभीर विषय प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केलाय. यासाठी मांजरेकरांची तळमळ सिनेमाच्या दिग्दर्शनात आणि संवादात दिसते. परंतु 'मी शिवाजीराजे भोसले बोलतोय'सारखा हा सिनेमा दीर्घकाळ मनात घर करत नाही, हेही तितकंच खरं. तरीही एक नवा प्रयत्न आणि महेश मांजरेकरांच्या सिनेमांचे चाहते असाल तर सिनेमागृहात 'पुन्हा शिवाजीराजे भोसले' एकदा बघू शकता.

टॅग्स :महेश मांजरेकर राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारपृथ्वीक प्रतापमहाराष्ट्राची हास्य जत्रासिद्धार्थ जाधवमराठी चित्रपटमराठी अभिनेता