Dashavtar Marathi Movie Review: काही वर्षांपूर्वी आलेला 'कांतारा' सिनेमा सर्वांना आठवत असेलच. 'दशावतार' सिनेमाच्या ट्रेलरवरुन याची तुलना 'कांतारा'सोबत झाली होती. कोकणच्या मातीत घडणारं दशावतारी नाटक हे परंपरा आणि संस्कृतीचं प्रतीक मानलं जातं. त्यामुळेच 'दशावतार' सिनेमाची घोषणा झाली तेव्हा उत्सुकता शिगेला पोहोचली. या सिनेमाच्या निमित्ताने दशावतारी नाटक रुपेरी पडद्यावर अनुभवायला मिळणार असल्याने, कुतुहल निर्माण झालं होतं. कसा आहे 'दशावतार' सिनेमा? जाणून घ्या
कथानक:
सिनेमाची कथा कोकणातील एका गावात दशावतारी नाटकांमध्ये काम करणारे ज्येष्ठ नट बाबुली (दिलीप प्रभावळकर) यांच्याभोवती फिरते.. बाबुलीला गावात मोठा मान असतो. दशावतारी नाटकांमध्ये त्यांनी रंगवलेली विविध पात्र बघायला मोठी गर्दी जमते. बाबुलीचं गावावर खूप प्रेम. याशिवाय गावातील जंगल आणि राखणदार यांच्यावर बाबुलीची नितांत श्रद्धा असते. माधव (सिद्धार्थ मेनन) हा बाबुलीचा एकुलता एक मुलगा.
वयोमानाप्रमाणे बाबुलीने आता दशावतारात काम न करुन आराम करावा ही माधवची इच्छा. परंतु लेकाला नोकरी मिळेल तेव्हा दशावतारात काम करणं बंद करेल, अशी बाबुलीची अट असते. पुढे माधवला नोकरी मिळते. त्यामुळे बाबुली महाशिवरात्रीच्या दिवशी शेवटचा दशावतार करण्याचं ठरवतो. परंतु त्याचवेळी मोठी घटना घडते आणि बाबुलीच्या पायाखालची जमीन सरकते. नेमकं काय घडतं? याचं उत्तर तुम्हाला 'दशावतार' सिनेमा पाहून मिळेल.
दिग्दर्शन:
सुबोध खानोलकर यांनी 'दशावतार' सिनेमाची कथा लिहिली असून दिग्दर्शनाची जबाबदारी सांभाळली आहे. सिनेमाची संकल्पना अगदी उत्तम होती. त्यासाठी सुरुवातीपासून वातावरणनिर्मिती चांगली तयार केली होती. परंतु कथेचा मोठा कॅनव्हास मोठ्या पडद्यावर मांडण्यात दिग्दर्शकाची दमछाक झालेली दिसते. सिनेमा सुरुवातीला बराच वेळ रेंगाळतो. मध्यंतरापर्यंत व्यक्तिरेखांचा आलेख प्रेक्षकांसमोर आणण्यात प्रसंग थोडे ताणल्यासारखे वाटतात. मध्यंतरानंतर मात्र 'दशावतार' प्रेक्षकांची पकड घेण्यात यशस्वी ठरतो. सिनेमातले काही प्रसंग खिळवून ठेवतात. परंतु शेवटी 'दशावतार'ची गाडी पुन्हा रुळावरुन घसरते आणि निराशा होते. एकाचवेळी अनेक गोष्टी दाखवण्याचा प्रयत्न दिसतो.
संगीत आणि गाणी:
संपूर्ण सिनेमात संथ प्रसंग प्रभावी करण्याचं काम ए.व्ही.प्रफुल्लचंद्र यांच्या संगीताने केलंय. 'दशावतार' सिनेमाच्या कथेची नस ए.व्ही.प्रफुल्लचंद्र यांना बरोबर सापडल्याने त्यांचं संगीत चांगला परिणाम साधतं. सिनेमातील गाणीही कथानक पुढे नेण्याचं काम करतात आणि ऐकायला छान वाटतात.
अभिनय:
'दशावतार' सिनेमात दिलीप प्रभावळकर यांचा अभिनय पाहणं ही प्रेक्षकांसाठी मोठी पर्वणी आहे. एखाद्या नटाला स्वप्नवत वाटावी, अशी बाबुलीची भूमिका दिलीप यांनी समर्थपणे साकारली आहे. त्यांची एनर्जी, संवादफेक उत्कृष्ट आहे. दशावतारी खेळात त्यांनी रंगवलेली विविध पात्र थक्क करुन सोडतात. महेश मांजरेकर यांनी इन्स्पेक्टर मायकल डिसुजाच्या भूमिकेत रंगत निर्माण केली आहे. वडिलांवर प्रेम करणारा, महत्वांकाक्षी असा सिद्धार्थ मेननने साकारलेला माधव लक्षात राहतो. प्रियदर्शनी इंदलकर, रवी काळे, भरत जाधव, विजय केंकरे, अभिनय बेर्डे, सुनील तावडे यांनीही त्यांच्या भूमिका चांगल्या निभावल्या आहेत.
सकारात्मक बाजू: कोकणी वातावरण, दशावतारी नाटकांची झलक, संगीत, अभिनयनकारात्मक बाजू: संथ कथानक, अपेक्षाक्षंग करणारा शेवट, सुरुवातीचे लांबणारे प्रसंग
थोडक्यात सांगायचं तर, 'दशावतार' हा मराठीतला एक उत्कृष्ट सिनेमा होऊ शकला असता. सिनेमाच्या कथेत ती क्षमता होती. शेवटपर्यंत काहीतरी भन्नाट घडेल असं वाटत राहतं. पण आपल्या अपेक्षांची पातळी गाठण्यात सिनेमा कमी पडतो. तरीही मराठी सिनेसृष्टीतला एक वेगळा प्रयत्न, दिलीप प्रभावळकरांचा भन्नाट अभिनय आणि संगीताची जादू अनुभवण्यासाठी 'दशावतार' सिनेमा एकदा चित्रपटगृहात नक्की पाहू शकता.