'रंग माझा वेगळा' (Rang Maza Vegla) मालिकेतून अभिनेत्री रेश्मा शिंदे (Reshma Shinde) घराघरात पोहचली आहे. या मालिकेतील दीपाच्या भूमिकेनं तिला चांगलीच लोकप्रियता मिळवून दिली. या मालिकेनंतर आता ती घरोघरी मातीच्या चुली या मालिकेत काम करताना दिसते आहे. या मालिकेत तिने जानकीची भूमिका निभावली आहे. रेश्मा शिंदे हिने २९ नोव्हेंबरला तिचा प्रियकर पवनसोबत लग्न केले. तो साउथ इंडियन असून त्या दोघांचं लग्न महाराष्ट्रीयन आणि साउथ इंडियन पद्धतीने झाले. त्यांच्या लग्नाला इंडस्ट्रीतील कलाकारांनी हजेरी लावली होती. दरम्यान, आता रेश्माने सोशल मीडियावर त्यांच्या हळदीचा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओला चाहत्यांची पसंती मिळताना दिसते आहे.
अभिनेत्री रेश्मा शिंदे हिने इंस्टाग्रामवर हळदीचा व्हिडीओ शेअर केला आहे. तिच्या हळदीचा कार्यक्रम २८ नोव्हेंबरला पार पडला. त्यांनी डेस्टिनेशन व्हेडिंग केले होते. पानशेत येथील एका रिसॉर्टमध्ये त्यांचे लग्न पार पडले. तिने हळदीचा व्हिडीओ शेअर करत लिहिले की, माझी हळद. हळदी समारंभाला त्यांनी साउथ इंडियन थीम ठेवली होती. त्यावेळी रेश्माने पिवळ्या रंगाचा लेहंगा परिधान केला होता. तर पवनने पिवळ्या रंगाचा कुर्ता पायजमा घातला होता. तर बाकीच्यांनी व्हाइट रंगाचा साउथ इंडियन लूक केला होता. या व्हिडीओत ते धमालमस्ती करताना दिसत आहेत.
रेश्मा शिंदेचा नवरा पवन आयटी क्षेत्रात कार्यरत आहे. तो युकेला होता. मात्र रेश्माचे अभिनयातील करिअर तसेच तिने नव्याने सुरु केलेला ज्वेलरी व्यवसाय यामुळे त्याने पुन्हा भारतात येण्याचा निर्णय घेतला. दोघांचे थाटामाटात लग्न झाले. लग्नानंतर रेश्मा तिच्या बंगळुरु येथील सासरीही गेली होती. तिथे तिच्या सासरच्या मंडळींनी जंगी स्वागत केले होते. त्यानंतर आता रेश्मा पुन्हा कामावर परतली आहे.