Join us

या दिवंगत अभिनेत्रीची मुलगी बनली लेखिका, लवकरच येणार तिचा चित्रपट

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 24, 2020 18:20 IST

या अभिनेत्रीने अनेक वर्षं बॉलिवूडवर राज्य केले.

ठळक मुद्देमृण्मयी लागूने आजवर अभिनय, दिग्दर्शन आणि लेखन अशा सर्वच आघाड्यांवर आपली गुणवत्ता सिद्ध केली आहे. थप्पड़ची कथा हेलावून टाकणारी आणि विचार करायला प्रवृत्त करणारी असून तिचे सर्वच स्तरांतून कौतुक होत आहे.

रिमा लागू यांनी मैने प्यार किया, आशिकी, साजन, हम आपके है कौन, वास्तव, कुछ कुछ होता हैं आणि हम साथ साथ है या गाजलेल्या हिंदी चित्रपटात साकारलेली आईची व्यक्तिरेखा आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहे. त्यांनी 50 पेक्षा जास्त हिंदी आणि मराठी चित्रपटांमध्ये काम केले. त्यांनी छोट्या पडद्यावर देखील खूप चांगल्या भूमिका साकारल्या. त्यांची तू तू मैं मैं ही मालिका आज इतक्या वर्षांनी देखील प्रेक्षकांच्या लक्षात आहे.

रिमा लागू यांच्या अचानक झालेल्या निधनामुळे त्यांच्या फॅन्सना चांगलाच धक्का बसला होता. त्यांच्या फॅन्ससाठी आता एक चांगली बातमी आहे. त्यांची मुलगी मृण्मयी लागू लेखिका बनली असून तिचा हिंदी चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. 

"थप्पड़, बस इतनी सी बात?" या संवादाची सध्या चांगलीच चर्चा रंगली आहे. तापसी पन्नूची मुख्य भूमिका असलेल्या थप्पड या आगामी चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीस आल्यापासून या चित्रपटाविषयी प्रेक्षकांच्या मनात उत्सुकता निर्माण झाली आहे. दिग्दर्शक अनुभव सिन्हा यांच्यासोबत या चित्रपटाचे कथानक मृण्मयी लागूने लिहिले आहे. घरगुती हिंसा सहन करू नका असा महत्त्वपूर्ण संदेश या चित्रपटाद्वारे देण्यात आला आहे.

मृण्मयी लागूने आजवर अभिनय, दिग्दर्शन आणि लेखन अशा सर्वच आघाड्यांवर आपली गुणवत्ता सिद्ध केली आहे. थप्पड़ची कथा हेलावून टाकणारी आणि विचार करायला प्रवृत्त करणारी असून तिचे सर्वच स्तरांतून कौतुक होत आहे. थप्पड़च्या निमित्ताने निर्मात्यांनी एका महत्त्वाच्या विषयाला हात घातला आहे.

थप्पड़ या चित्रपटात तापसी पन्नू, रत्ना पाठक शाह, मानव कौल, दिया मिर्झा, तन्वी आजमी आणि राम कपूर यांच्या प्रमुख भूमिका आहेत. अनुभव सिन्हा आणि भूषण कुमार यांनी या चित्रपटाची निर्मिती केली असून हा चित्रपट २८ फेब्रुवारी २०२० ला प्रदर्शित होणार आहे.  

टॅग्स :रिमा लागूथप्पडतापसी पन्नू