Join us
Daily Top 2Weekly Top 5

'तमाशा लाईव्ह'मध्ये रंगला बातम्यांचा फड, 'फड लागलाय' गाणं रिलीज

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 11, 2022 12:51 IST

Tamasha Live: ‘तमाशा लाईव्ह’ची ही म्युझिकल ट्रीट येत्या १५ जुलैपासून संगीत प्रेमींसाठी सादर होणार आहे. याच सांगितिक मैफलीतील आणखी एक गाणे रसिकांच्या भेटीला आले आहे.

संगीत… भावना व्यक्त करण्याचे एक उत्तम माध्यम. या संगीतातून जर एखादी कथा पुढे जात असेल तर? संगीत प्रेमींसाठी तर ही एक पर्वणीच ठरेल. असाच संगीत नजराणा घेऊन दिग्दर्शक संजय जाधव (Sanjay Jadhav) सज्ज झाले आहेत. ‘तमाशा लाईव्ह’(Tamasha Live)ची ही म्युझिकल ट्रीट येत्या १५ जुलैपासून संगीत प्रेमींसाठी सादर होणार आहे. याच सांगितिक मैफलीतील आणखी एक गाणे रसिकांच्या भेटीला आले आहे. 'फड लागलाय' असं या गाण्याचे बोल असून 'ब्रेकिंग न्यूज' मिळवण्यासाठीची चाललेली शर्यत या गाण्यात पाहायला मिळत आहे. हे गाणे अमितराज, साजन बेंद्रे आणि वैशाली सामंत यांनी गायले असून याला अमितराज यांनी संगीत दिले आहे. तर क्षितीज पटवर्धन यांनी या गाण्याला शब्दबद्ध केले आहे. 

‘तमाशा लाईव्ह’मधील प्रत्येक गाणे वेगळ्या धाटणीचे आहे. प्रत्येक गाण्यात एक घटना आहे, जी कथेला पुढे घेऊन जाणारी आहे. सिद्धार्थ जाधव आणि हेमांगी कवीवर चित्रीत झालेल्या या गाण्यातूनही कथा पुढे जात असून या गाण्यात बातम्यांचा फड रंगला आहे. या गाण्याचे नृत्य दिग्दर्शन उमेश जाधव यांनी केले आहे.नया गाण्याविषयी गीतकार क्षितीज पटवर्धन म्हणतात," 'तमाशा लाईव्ह'ची सर्वच गाणी उत्तम आहेत. मला याचा फार आनंद होत आहे. एक गीतकार म्हणून पहिल्यांदाच मला अशी संधी मिळाली की,  एकाच चित्रपटामध्ये शास्त्रीय संगीतापासून रॅपपर्यंत आणि गरब्यापासून पंजाबी गाण्यापर्यंत सर्व प्रकारची  गाणी मी या चित्रपटात लिहीली आहेत. चार, पाच चित्रपटातील गाण्यांचा भाव एकाच चित्रपटात आहे. हा एक वेगळाच अनुभव होता.'' 

एटीएट पिक्चर्स प्रस्तुत, अक्षय बर्दापूरकर निर्मित 'तमाशा लाईव्ह' सहनिर्माते सौम्या विळेकर (प्लॅनेट मराठी, अ व्हिस्टास मीडिया कॅपिटल कंपनी), माऊली प्रॉडक्शन्स, डॉ. मनीषा किशोर तोलमारे, समीर विष्णू केळकर व अजय वासुदेव उपर्वात असून चित्रपटाची कथा मनिष कदम यांची आहे. तर अरविंद जगताप यांचे संवाद लाभले आहेत.

टॅग्स :सिद्धार्थ जाधवहेमांगी कवीसंजय जाधव