Join us
Daily Top 2Weekly Top 5

रमशा फारुकी ठरली 'जाऊ बाई गावात'च्या पहिल्या पर्वाची विजेती! ट्रॉफी आणि मिळाले 'इतके' लाख रुपये

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2024 08:34 IST

रविवारी रंगलेल्या महाअंतिम सोहळ्यात रमशा फारुकी 'जाऊ बाई गावात'च्या पहिल्या पर्वाची विजेती ठरली. 

छोट्या पडद्यावरील लोकप्रिय रिएलिटी शो असलेल्या ‘जाऊ बाई गावात’चा महाअंतिम सोहळा नुकताच पार पडला. झी मराठी वाहिनीवरील या रिएलिटी शोचे घराघरात चाहते आहेत. या शोच्या पहिल्याच पर्वाने प्रेक्षकांची मनं जिंकून घेतली. ३ महिन्यांनंतर या शोला पहिल्या पर्वाचा विजेता मिळाला. रविवारी रंगलेल्या महाअंतिम सोहळ्यात रमशा फारुकी 'जाऊ बाई गावात'च्या पहिल्या पर्वाची विजेती ठरली. 

मनोरंजन आणि विविध टास्कने भरलेल्या त्याबरोबरच अस्सल मराठी मातीतला आणि गावाशी नाळ जोडलेल्या जाऊ बाई गावात या कार्यक्रमाने प्रेक्षकांची मनं जिंकली. या शोमध्ये सहभागी झालेल्या स्पर्धकांनी गावकऱ्यांची मनं जिंकली. जाऊ बाई गावातच्या अंतिम सोहळ्यासाठी महेश मांजरेकर, आदेश बांदेकर आणि सोनाली कुलकर्णी यांनी विशेष हजेरी लावली होती. रमशा फारुकी, रसिका ढोबळे, संस्कृती साळुंके, अंकिता मेस्त्री आणि श्रेजा म्हात्रे या ‘जाऊ बाई गावात’च्या पहिल्या पर्वाच्या टॉप ५ स्पर्धक होत्या. ‘जाऊ बाई गावात’च्या ट्रॉफीवर नाव कोरत रमशाने विजेतेपदाचा मान पटकावला. तर अंकिता मेस्त्री उपविजेती ठरली. 

‘जाऊ बाई गावात’ची विजेती ठरलेल्या रमशाला ट्रॉफीबरोबरच २० लाख रुपये बक्षीस म्हणून मिळाले. या पर्वाची विजेती ठरलेल्या रमशाने  आपला आनंद व्यक्त केला. ती म्हणाली, " Oh My God! तो क्षण जेव्हा सरांनी माझं नाव घेतलं आणि बोलले की गावाची लाडकी लेक आणि 'जाऊ बाई गावातच्या' पहिल्या पर्वातली  विजेती आहे 'रमशा'. तेव्हा मला वाटलं की मी स्वप्न पाहत आहे. कारण, गेले २ महिने मी हा क्षण स्वप्नात पाहत होती.पण जेव्हा गावकऱ्यांचा उत्साह आणि सगळे स्पर्धक मला मिठी मारायला आले तेव्हा वाटलं खरंच मी विजेती झाली आहे. माझ्या मनात तो डायलॉग चालू होता 'इतनी शिद्दत से इस ट्रॉफी को पाने की कोशिश की है की हर एक गावकरी ने इससे मुझे मिलाने की साज़िश की है"." 

"मी स्वतःला हेच म्हणाली की ही फक्त सुरवात आहे रमशा अजून तुला खूप पुढे जायचं आहे आणि जसं  'जाऊ बाई गावात' ह्या शोला १०० % दिले आहेत, तसंच पुढेही द्यायचं आहे. कारण यशासाठी कुठलाही शॉर्टकट नाही. माझ्या धन्यवादाची लिस्ट खूप मोठी आहे सुरवात गावकऱ्यांपासून करेन. मला त्यांनी प्रेम, माणुसकी, आपली संस्कृती शिकवली. थोडक्यात सुखी कसं राहायचं हे शिकवलं. मी कधी विचारही  केला नव्हता की कोणी इतकं आपल्यावर प्रेमही करू शकतं. 'जाऊ बाई गावात' आणि झी मराठीच्या पूर्ण टीमचे मन:पूर्वक आभार मानायचे आहेत. इतकी सुंदर संधी दिली आणि मला एवढं शिकायला मिळालं आणि प्रेक्षकांचे धन्यवाद त्यांनी मला आपलं मानलं आणि प्रेम दिलं. मी गावाला खूप मिस करणार आहे. मी ठरवले आहे की मी गावात एक घर घेणार. मी गावाच्या इतकं प्रेमात पडली आहे," असंही रमशा पुढे म्हणाली. 

टॅग्स :टिव्ही कलाकारझी मराठी