बॉलिवूडचा अष्टपैलू अभिनेता राजकुमार राव सध्या चर्चेत आहे. 'निकम' या बायोपिकमध्ये राजकुमार मुख्य भूमिका साकारत आहे. या भूमिकेसाठी त्याने केलेल्या शारीरिक बदलाची सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू आहे. दरम्यान, एका युजरने त्याला 'प्रोपगंडा चित्रपट' न बनवण्याचा सल्ला दिला, ज्याला राजकुमारने मोजक्या शब्दांत सडेतोड उत्तर दिले.
राजकुमारने सोशल मीडियावर आपल्या आगामी चित्रपटातील लूक आणि मेहनतीबद्दल एक सविस्तर पोस्ट लिहिली. या पोस्टवर एकानं कमेंट केली, "सर, कृपया प्रोपगंडा चित्रपट बनवू नका". राजकुमारने या कमेंटची दखल घेत लगेच उत्तर दिले, "कधीच नाही".
ज्येष्ठ वकिल उज्ज्वल निकम यांच्यासारखं दिसण्यासाठी राजकुमारने प्रोस्थेटिक्सचा (मेकअप) आधार न घेता नैसर्गिक बदलावर भर दिला. यासाठी त्याने या भूमिकेसाठी तब्बल ९ ते १० किलो वजन वाढवले. वजन वाढवण्यासाठी त्याने दिवसातून दोन पिझ्झा, भरपूर मिठाई, आलू पराठे आणि बिर्याणी यांसारख्या पदार्थांचे सेवन केले. राजकुमारने पात्राच्या गरजेनुसार त्याने आपले केस कमी (पातळ) केले, ज्याला त्याच्या हेअरस्टायलिस्टचा विरोध होता. मात्र, भूमिकेत वास्तवता आणण्यासाठी त्याने हा धोका पत्करला.
आपल्या कामाप्रती असलेल्या समर्पणाबद्दल बोलताना राजकुमार म्हणाला, "जोपर्यंत मी स्वतःच्या मेहनतीने तो लूक मिळवू शकतो, तोपर्यंत मी प्रोस्थेटिक्सवर विश्वास ठेवत नाही. मग ते वजन वाढवणं असो किंवा वयस्कर दिसणं असो. मी भूमिकेत शिरण्यासाठी काहीही करायला तयार असतो".
'निकम' या बायोपिकनंतर राजकुमार रावनं पुन्हा भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार सौरव गांगुली यांच्या जीवनावर आधारित चित्रपटासाठी कंबर कसली आहे. राजकुमारने यापूर्वी 'बोस', 'श्रीकांत' आणि 'ट्रॅप्ड' सारख्या चित्रपटांतून आपली ताकद दाखवून दिली आहे. आता एक कायदेतज्ज्ञ आणि त्यानंतर थेट क्रिकेटच्या मैदानात 'दादा' बनून एन्ट्री घेणारा राजकुमार प्रेक्षकांना किती भुरळ घालतो, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.