Join us

एकेकाळी 'या' अभिनेत्याकडे नव्हते शाळेची फी भरायला पैसे, आज आहे 81 कोटींचा मालक

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 3, 2023 12:51 IST

Bollywood actor: सायकलवरुन गाठायचा ७० किलोमीटरचं अंतर

इंडस्ट्रीमध्ये आज असे अनेक कलाकार आहेत जे यश, संपत्ती,स्टारडम अनुभवत आहेत. मात्र, या कलाकारांचा हा प्रवास सोपा नव्हता. अनेक कलाकारांनी अथक मेहनत करुन सिनेसृष्ट्रीत त्यांचं नाव कमावलं आहे. यामध्येच आज आपण अशा एका कलाकाराविषयी जाणून घेऊयात. ज्याने इंडस्ट्रीत येण्यापूर्वी प्रचंड मोठा स्ट्रगल केला आहे. अगदी एकेकाळी त्याने ७० किलोमीटरचा प्रवास पायी केला आहे.राजकुमार राव हे नाव आता कोणालाही नवीन राहिलेलं नाही. अनेक गाजलेल्या सिनेमामध्ये त्याने काम केलं आहे. परंतु, सिनेसृष्टीत येण्यापूर्वी त्याला प्रचंड हालाखीच्या दिवसांना सामोरं जावं लागलं. मनोज वाजपेयी यांचा अभिनय पाहून राजकुमारने अभिनेता होण्याचं स्वप्न पाहिलं. त्यामुळे शाळा, कॉलेजमध्ये असल्यापासून तो थिएटर करायचा. 

२००८ मध्ये त्याने अभिनेता होण्यासाठी मुंबई गाठली. इथे आल्यावर त्याने FTII मधून अभिनयाचा कोर्स केला.  परंतु, अभिनयाचा कोर्स केल्यानंतरही त्याला काम मिळवताना खूप स्ट्रगल करावा लागला. त्यामुळे कलाविश्वात काम मिळेपर्यंत तो लहानमोठी काम करुन उदरनिर्वाह करत होता. एका मुलाखतीमध्ये त्याने त्याच्या स्ट्रगल काळाविषयी भाष्यदेखील केलं.

सायकलवरुन गाठायचा ७० किलोमीटरचं अंतर

राजकुमार शाळेत असताना त्याच्या घरची परिस्थिती प्रचंड हालाखीची होती. त्यामुळे त्याला शाळेची फी भरायलाही पैसे नसायचे. विशेष म्हणजे राजकुमारच्या घरच्या परिस्थितीविषयी माहिती असल्यामुळे त्याच्या एका शिक्षकांनी त्याची २ वर्षांची फी भरली होती. पुढे राजकुमार FTII मध्ये शिकत असताना तो एका लहानशा घरात राहत होता. या घराचं दरमहिना त्याला ७ हजार रुपये भाडं द्यावं लागत होतं.  त्यामुळे तो भाड्याचे पैसे भरण्यासाठी लहानमोठी काम करायचा. तसंच तो राहत असलेल्या घरापासून FTII जवळपास ७० किलोमीटर लांब होतं. त्यामुळे तो दररोज ७० किलोमीटरचं हे अंतर सायकलवरुन पार करायचा.

बरेच कष्ट, अनेक वर्ष वाट पाहिल्यानंतर राजकुमारला रामगोपाल वर्मा यांच्या 'रन' या सिनेमात लहानशी भूमिका करायची संधी मिळाली. परंतु, त्यानंतर पुन्हा तो बेरोजगार झाला. त्यामुळे शेवटी त्याने अभिनय सोडण्याचा विचार केला होता. परंतु, त्याचवेळी त्याला लव्ह, सेक्स और धोका या सिनेमाची ऑफर मिळाली.

किती आहे राजकुमारची संपत्ती?

एकेकाळी राजकुमार लहान-मोठ्या भूमिका करुन महिन्याला १० हजार रुपये कमवायचा. तोच राजकुमार आज एका प्रोजेक्टसाठी ५ ते ६ कोटी रुपये चार्ज करतो. इतकंच नाही तर मुंबईत त्याचं स्वत:चं घरदेखील आहे. विशेष म्हणजे आज राजकुमार ८१ कोटी रुपये संपत्तीचा मालक आहे. तो ब्रँड एंडोर्समेंटद्वारेही १ ते २ कोटींची कमाई करतो. 

टॅग्स :राजकुमार रावबॉलिवूडसेलिब्रिटी