राजकुमार राव मुख्य भूमिकेत असलेल्या 'भूल चूक माफ' या सिनेमाची गेल्या कित्येक दिवसांपासून चाहते वाट पाहत आहेत. या सिनेमाच्या टीझरपासून चित्रपटाबाबत प्रेक्षकांची उत्सुकता वाढली आहे. आता या सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला आहे. राजकुमार रावच्या 'भूल चूक माफ' सिनेमाच्या धमाकेदार ट्रेलरनंतर चित्रपट प्रदर्शित होण्याची वाट चाहते पाहत आहेत.
'भूल चूक माफ' सिनेमात प्रेमासाठी पळून जाऊन लग्न करण्यासाठी इच्छुक असलेल्या एका कपलची स्टोरी दाखवण्यात येणार आहे. पळून गेल्यानंतर घरातील लोक त्यांचं लग्न लावून देण्यासाठी तयार होतात. मेहेंदी होते, हळदही लागते मात्र लग्नाचा दिवस काही उजाडतच नाही. राजकुमारला हळद तर लागते. पण, दुसऱ्या दिवशी तो उठतो तेव्हा घरचे पुन्हा त्याच्या हळदीची तयारी करत असल्याचं दिसतं. हे एकदा नव्हे तर पुन्हा पुन्हा होत असल्याचं ट्रेलरमध्ये दिसत आहे.
शेवटी वैतागून राजकुमार राव देवाकडे नवसही बोलतो. पण, तरी तिढा सुटत नाही. शेवटी ते डॉक्टरही गाठतात, पण तरी काही होत नाही. आयुष्यात लग्नाचा दिवस का येत नाही? आणि पुन्हा हळदीचा दिवसच का येतोय? हे अभिनेत्यालाही कळत नाहीये. 'भूल चूक माफ'चा हा ट्रेलर बुचकळ्यात पाडणारा आहे. पण, यामुळे सिनेमाची उत्सुकता आणखी वाढली आहे.
दरम्यान, 'भूल चूक माफ' सिनेमात राजकुमार रावसोबत वामिका गब्बी मुख्य भूमिकेत आहेत. मॅडॉक फिल्मची निर्मिती असलेला 'भूलचूक माफ' सिनेमा ९ मेला प्रदर्शित होणार आहे. या सिनेमाचं दिग्दर्शन करण शर्मा यांनी केलं असून दिनेश विजन यांची निर्मिती आहे.