Join us

रजनीकांत यांचं मराठी ऐकलंत का? सुपरस्टारचा जुना व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 11, 2025 16:31 IST

या व्हिडीओमध्ये ते शुद्ध आणि आत्मीयतेने मराठीत बोलताना दिसले.

Rajinikanth Marathi Speakng Old Video Viral: दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील सुपरस्टार रजनीकांत हे केवळ तमिळ किंवा हिंदी चित्रपटांसाठीच नव्हे, तर जगभरात लोकप्रिय आहेत. दाक्षिणात्य भारतात तर प्रेक्षक त्यांना देव मानतात.  त्यांची शैली, संवादफेक आणि व्यक्तिमत्त्व हे नेहमीच चर्चेचा विषय ठरतं. सध्या अशाच एका जुन्या व्हिडीओमुळे रजनीकांत पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. सध्या महाराष्ट्रात मराठी आणि हिंदी भाषेचा वाद चांगलाच पेटलेला आहे. यात रजनीकांत यांचा मराठी बोलतानाचा जुना व्हिडीओ व्हायरल होतोय. 

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये रजनीकांत मराठीत बोलताना दिसतात. त्यांच्या तोंडून स्पष्ट आणि भावनिक मराठी संवाद ऐकून नेटकऱ्यांनी कौतुकाचा वर्षाव केला आहे. खरं तर हा व्हिडीओ चार वर्षांपुर्वीचा आहे. रजनीकांत यांचा २०२० मध्ये 'दरबार' हा हिंदी सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीस आला होता. या सिनेमाच्या ट्रेलर लाँचवेळेस त्यांनी पत्रकारांशी मराठीत संवाद साधला होता. त्यांनी मराठीतच नम्रपणे सांगितलं होतं की, "माझ्या मराठी भाषेची लय ही बेळगावच्या मराठीची आहे". मराठीत बोलताना त्यांनी मुंबईकरांवरचं प्रेम व्यक्त केलं होतं. तसेच मराठी सिनेमात काम करण्याची इच्छाही व्यक्त केली होती. त्यांचा हा जुना व्हिडीओ सोशल मीडियावर सध्या व्हायरल होतोय.

हिंदी-साऊथ चित्रपटसृष्टीत अनेक चित्रपट करुन प्रेक्षकांच्या मनात जागा निर्माण करणारे रजनीकांत हे मुळचे महाराष्ट्रीयन आहेत. रजनीकांत यांचा जन्म १२ डिसेंबर १९५० रोजी बंगळूर येथे एका महाराष्ट्रीयन मराठी कुटूंबात झाला. त्यांचे खरे नाव शिवाजीराव गायकवाड असून वडिलांचे रामोजीराव आणि आईचे जीजाबाई गायकवाड असे आहे. गायकवाड कुटुंबीयांच्या चार अपत्यांपैकी सर्वात लहान रजनीकांत आहेत. त्यांचे मुळ गाव पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातील कोयाळी आहे असे सांगितले जाते. पण, अद्याप मराठी चित्रपटांत काम केले नाही. त्यामुळे त्यांचे मराठमोळे चाहते रजनीकांत मराठीत अभिनय कधी करणार याच प्रतिक्षेत सध्या तरी आहेत. 

टॅग्स :रजनीकांतमराठीसोशल मीडिया