Rajeshwari Kharat: जम्मू-काश्मीरच्या पहलगाममध्ये २२ एप्रिल रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर (Pahalgam Attack) संपूर्ण देश हळहळला. पहलगाम येथील बैसरन पर्वत रांगेच्या खोऱ्यात दहशतवाद्यांनी पर्यटकांवर बेछूट गोळीबार केला आणि या घटनेत २६जणांचा मृत्यू झाला, तर काहीजण जखमी झाले आहेत. जगभरातून या घटनेचा निषेध व्यक्त केला जातो आहे. मनोरंजन विश्वातील अनेक सेलिब्रिटींनी या घटनेनंतर संताप आणि दु:ख व्यक्त केले. अभिनेत्री राजेश्वरी खरातनेही पोस्ट शेअर करत दु:ख व्यक्त केलं.
पहलगाम हल्ल्यातील गोळाबारात मृत्यू झाल्यानंतर लेफ्टनंटची पत्नी त्याच्या मृतदेहाजवळ बसून होती. या फोटोचा एआय जनरेटेड फोटोही राजेश्वरीने शेअर केलाय. त्या फोटोवर "मृत्यूनेही धर्म बघितला" असं लिहलेलं आहे. तर दुसऱ्या स्टोरीमध्ये तिनं एक बंदुकधारी दहशतवादी एका छोट्या बाळाला धर्म विचारतानाचं व्यंगचित्र शेअर केलंय. तर आणखी एका स्टोरीमध्ये राजेश्वरीनं "त्यांनी हल्ला करताना राज्य, भाषा नाही विचारली तर धर्म विचारला" असं लिहलेला फोटो पोस्ट केलाय.
पहलगाममध्ये निष्पापांवर भ्याड हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांना पकडून कठोरात कठोर शिक्षा दिण्याची मागणी केली जात आहे. सोशल मीडियावर कलाविश्वातून सई ताम्हणकर, प्रसाद ओक, सुव्रत जोशी, शिवानी रांगोळे, मेघा धाडे, तेजस्विनी पंडित अशा अनेकांन पहलगाम दुर्घटनेनंतर सोशल मीडियावर पोस्ट शेअर केल्या आहेत.
दरम्यान, राजेश्वरी अलिकडेच चर्चेत आली होती. नागराज मंजुळे यांच्या सुपरहिट आणि राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या फॅन्ड्री या सिनेमातून घराघरात लोकप्रिय झालेली राजेश्वरीनं नुकतंच धर्मांतर (Rajeshwari Kharat Accept Christian Religion) केलं आहे. अभिनेत्रीनं ख्रिश्चन धर्म स्वीकारला आहे. ज्यामुळे अभिनेत्रीला ट्रोल देखील करण्यात आलं.