बॉलिवूडचे पहिले सुपरस्टार अशी ज्यांची ओळख आहे ते म्हणजे राजेश खन्ना.बॉलिवूडमध्येराजेश खन्ना (rajesh khanna) यांना सर्वजण प्रेमाने 'काका' म्हणतात. राजेश खन्ना आज आपल्यात नसले तरीही त्यांची पुढची पिढी बॉलिवूडमध्ये सक्रीय आहे. राजेश खन्ना यांची पत्नी डिंपल कपाडिया या गेल्या काही वर्षांमध्ये बॉलिवूड सिनेमांमध्ये विविध भूमिका साकारताना दिसत आहेत. अशातच काल एका बॉलिवूड इव्हेंटमध्ये राजेश खन्ना यांची नात दिसून आली. आजी डिंपलसोबत (diimple kapadia) राजेश खन्ना यांच्या नातीने सर्वांचं लक्ष वेधलं. जाणून घ्या राजेश खन्नांच्या नातीविषयी.
कोण आहे राजेश खन्ना यांची नात
राजेश खन्ना यांच्या नातीचं नाव आहे नाओमिका सरन. आजी डिंपल कपाडियासोबत नाओमिकाने काल मॅडॉक फिल्मने आयोजित केलेल्या एका इव्हेंटमध्ये सहभाग घेतला. नाओमिकाने आजीसोबत या इव्हेंटमध्ये सर्वांचं लक्ष वेधलं. नाओमिकाच्या नम्र स्वभावाचं आणि तिच्या सौंदर्याचं अनेकांनी कौतुक केलं. अनेकांनी नाओमिकाला भविष्यातील यशस्वी अभिनेत्री असं म्हटलं आहे. डिंपल कपाडिया यांना ट्विंकल आणि रिंकी या दोन मुली. नाओमिका ही रिंकीची मुलगी आहे. रिंकी ही राजेश खन्ना-डिंपल यांची धाकटी लेक. २००३ साली रिंकीने समीर सरन यांच्याशी विवाह केला. समीर आणि रिंकी यांना २००४ साली मुलगी झाली तिचं नाव नाओमिका.
नाओमिकाच्या शिक्षणाबद्दल सांगायचं तर तिने लंडनमध्ये शिक्षण पूर्ण केलंय. ग्रॅज्युएशन पूर्ण झाल्यावर नाओमिकाने सोशल मीडियावर फोटो पोस्ट केले होते. तेव्हा नातीची शैक्षणिक प्रगती पाहून आजी डिंपल कपाडिया चांगलीच भावुक झाली होती. इव्हेंटमध्ये साध्या तरीही मनमोहक अंदाजात नाओमिकाने सर्वांचं लक्ष वेधलं. नाओमिका फोटो काढायला काहीशी लाजत असलेली दिसली. तेव्हा आजी डिंपलने तिला पुढे आणलं. नाओमिकाच्या नम्र स्वभावाचं चांगलंच कौतुक होतंय.