Join us

"मला सिनेमा सोडावासा वाटतोय.."; 'पुष्पा २'च्या वादग्रस्त घडामोडींनंतर दिग्दर्शक सुकुमार यांचं मोठं विधान

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 24, 2024 16:11 IST

'पुष्पा २'चे दिग्दर्शक सुकुमार यांनी एका इव्हेंटमध्ये केलेलं विधान चर्चेत आहे (pushpa 2, sukumar)

 'पुष्पा २' सिनेमाची सध्या चांगलीच चर्चा आहे. या सिनेमात अल्लू अर्जुनने साकारलेल्या भूमिकेचं चांगलंच कौतुक झालं.  'पुष्पा २' सिनेमा बॉक्स ऑफिसवर नवनवीन रेकॉर्ड मोडतोय. कमाईच्या बाबतीतही सिनेमाने नवीन विक्रम प्रस्थापित केलेत. परंतु 'पुष्पा २'च्या रिलीजनंतर मात्र सिनेमाने अनेक वाद ओढवून घेतले आहेत.  'पुष्पा २'च्या प्रिमियरला झालेल्या चेंगराचेंगरीत एका महिलेचा मृत्यू झाला. त्यानंतर अल्लू अर्जुनला अटक झाली, त्याच्या घरावरही हल्ला करण्यात आला. आता या सर्व घडामोडींनंतर 'पुष्पा २'च्या दिग्दर्शकाचं विधान चर्चेत आहे.

दिग्दर्शक सुकुमार काय म्हणाले?

अलीकडेच 'पुष्पा २'चे दिग्दर्शक सुकुमार हे राम चरणच्या आगामी 'गेम चेंजर' सिनेमाच्या इव्हेंटमध्ये सहभागी झाले होते. त्यावेळी इव्हेंटमध्ये एका अँकरने त्यांना विचारलं की, "अशी कोणती गोष्ट आहे जी तुम्ही सोडू इच्छिता?" त्यावेळी सुकुमार म्हणाले, "सिनेमा". सुकुमार यांचं उत्तर ऐकताच सर्वच जण चकीत झाले. इतकंच नव्हे त्यांच्या शेजारी बसलेल्या राम चरणलाही आश्चर्याचा धक्का बसला. त्याने सुकुमार यांच्या उत्तरावर नकारार्थी मान हलवली.

'पुष्पा २' रिलीजनंतर अनेक वाद

'पुष्पा २'च्या प्रिमियरला हैदराबादमधील संध्या थिएटरमध्ये हजारोंच्या संख्येने जमाव जमला होता. त्यावेळी अल्लू अर्जुनला पाहण्यासाठी आलेल्या कुटुंबातील महिलेचा चेंगराचेंगरीत मृत्यू झाला. या महिलेचा मुलगा सध्या हॉस्पिटलमध्ये जीवनाशी झुंज देत आहे. या घटनेमुळे अल्लू अर्जुनला काही दिवसांपूर्वी अटक करण्यात आली होती. याशिवाय त्याच्या घरावर हल्ला झाला होता. या घटनांमुळे व्यथित होऊन 'पुष्पा २'चे दिग्दर्शक इंडस्ट्री सोडणार का, याकडे सर्वांचं लक्ष आहे.

टॅग्स :पुष्पाअल्लू अर्जुनरश्मिका मंदाना