- संजय घावरे
काळानुरूप प्रत्येक गोष्ट बदलत असते. त्यानुसार चित्रपटसृष्टीतील काही गोष्टीही बदलल्या आहेत. कोणत्याही चित्रपटासाठी प्रमोशन हा अत्यंत महत्त्वाचा फॅक्टर आहे, पण अलिकडच्या सोशल मीडियाच्या काळात चित्रपटांच्या प्रमोशनचा फंडाही बदलला आहे. प्रमोशनचा बदललेला मंत्र आत्मसात केलेल्या निर्मात्यांचे सिनेमे पाहण्यासाठी प्रेक्षकही गर्दी करत आहेत.
पूर्वीच्या काळी केले जाणारे प्रमोशन खूप वेगळे होते. चित्रपटाचा मुहूर्त सोहळा, प्रसारमाध्यमांची सेट व्हिजीट, संगीत प्रकाशन सोहळा, ट्रेलर लाँच आणि प्रदर्शनापूर्वी घेतली जाणारी पत्रकार परिषद याद्वारे चित्रपटांचे प्रमोशन केले जायचे. प्रदर्शनापूर्वी प्रसारमाध्यमांना सिनेमा दाखवला जायचा. आजही बरेच प्रेक्षक परीक्षण वाचून सिनेमा पहायचा की नाही हे ठरवत असताना ज्या निर्माता-दिग्दर्शकांना सिनेमाबाबत आत्मविश्वास नसतो त्यांनी प्रेस शो करणे बंद केले आहे. यासोबत इतरही काही गोष्टी बंद झाल्या आहेत. बरेच सोहळे ऑनलाईन होतात. मुहूर्तानंतर सोशल मीडियावर फोटो आणि पोस्ट करून घोषणा केली जाते. ट्रेलर लाँचही अशाच प्रकारे केला जातो. सेट व्हिझीट हा प्रकार बऱ्याच वर्षांपूर्वी बंद झाला आहे. बऱ्याचदा संगीत प्रकाशनही सोशल मीडियावर केले जाते. या सर्वांऐवजी एखादीच पत्रकार परिषद घेऊन मुलाखतींसह संपूर्ण सिनेमाची माहिती दिली जाते. छोट्या पडद्यावरील लोकप्रिय शोजमध्ये जाऊन सिनेमाची टिम प्रमोशन करत आहे. ग्राऊंड इव्हेन्ट्सवर भरमसाठ खर्च केला जात आहे. विविध शहरांमध्ये सर्वसामान्यांसोबत प्रमोशन केलं जात आहे. रेडिओ शोजच्या माध्यमातून प्रेक्षकांशी संवाद साधला जात आहे. सार्वजनिक उत्सवांमध्ये प्रमोशनचे प्रमाण वाढले आहे. आजच्या काळात प्रमोशनचे मोजमाप सोशल मीडियावरील व्ह्यूज आणि लाईक्सद्वारे केले जात आहे. प्रमोशन किती झाले हे मोजण्याचे परिमाण बदलले आहे. काळानुरूप झालेल्या या बदलाचा इंडस्ट्रीलाही फायदा होत आहे. तंत्रांमधील बदल आणि बदललेल्या प्रसिद्धी माध्यमांमुळे चित्रपटांचा व्यवसाय वाढला आहे..........................पूर्वी आणि आता...पूर्वी पोस्टर्स आणि गावोगावी गाड्यांवर भोंगे लावून प्रचार केला जायचा. महाराष्ट्रात एका वेळी सिनेमा प्रदर्शित होत नसायचा. त्यामुळे ते तंत्र चालायचे. पूर्वी रंगारी, सुतार, प्रिंटर्स, प्रिंट पोहोचवणारे, रिळ चालवणाऱ्यांना डिमांड होते. आज सोशल मीडिया इन्फ्ल्युएन्झर्सने आहेत. सिनेमा एकाच वेळी महाराष्ट्रभर रिलीज होऊ लागल्याने बातम्या आणि जाहिराती येऊ लागल्या. प्रसारमाध्यमांचे माध्यमांतर झाल्याने प्रमोशनही डिजिटलाइज झाले. सोशल मीडिया हे स्वस्त आणि मस्त बनले. एकाच वेळी जास्तीत जास्त लोकांपर्यंत, कमी खर्चात, प्रभावी प्रमोशन होते. आज टिझर, मोशन पोस्टर, ट्रेलर, फर्स्ट लुक आणि माहितीही सोशल मीडियाद्वारे पोहोचवली जाते. ...................सोशल मीडियाला टाळणे अशक्य...सोशल मीडिया फ्रंट रनर बनल्याने इथे अॅक्टीव्ह असणाऱ्या कलाकारांना सिनेमाच्या प्रमोशनसाठी खूप फायदा होत आहे. रिअल टाईम स्टोरीज लोकांना कळतात. फेसबुक लाईव्हमुळे लोकांपर्यंत थेट माहिती पोहोचते. कलाकारांचे टिपिकल इंटरव्हूजही कमी झाले आहेत. वर्तमानपत्रात जाहिराती बघून सिनेमाला जाणारा प्रेक्षक वर्गही आहे, पण बुक माय शोवरून तिकीट बुक करणाऱ्यांची संख्या वाढली आहे. सोशल मीडियावरील क्रांतीमुळे टिझर-ट्रेलर खूप मोठी भूमिका बजावतो आणि म्युझिक हे सिनेमाचे इन्व्हिटेशन कार्ड ठरते.......................मराठी सिनेमाचे बजेट ३-४ कोटीप्रमोशन-वितरणासाठी १-२ कोटीसिनेमाच्या बजेटच्या ५० टक्के प्रमोशनसाठी३०% प्रिंट, ३०% टीव्ही, २०% सोशल मीडिया, २०% इव्हेन्टस (निर्माते व प्रमोशन टिमनुसार हे समीकरण बदलते)....................प्रमोशनमधील महत्त्वाचे फॅक्टर्स...१. मुद्रित माध्यमे - वर्तमानपत्रे, साप्ताहिके, मासिके२. टेलिव्हीजन - मनोरंजन व वृत्त वाहिन्या (२०-२२)३. रेडिओ स्टेशन्स - एफएम वाहिन्या (१२-१५ )४. सोशल मीडिया - फेसबुक, इन्स्ट्राग्राम, ट्विटर, युट्युब५. मोबाईल - एसएमएस, व्हॅाट्सअप, एमएमएस, क्लिप्स६. प्रमोशन अॅक्टिव्हीटीज - शहरांसोबतच प्रसारमाध्यमांना भेटी७. आऊटडोअर - होर्डिंग्ज, पोस्टर्स, बॅनर्स, रेल्वे, रिक्षा, टॅक्सी, बसेस........................
प्रमोशन करणारी माध्यमे प्रगत झाली असून, वेगवेगळे फॅारमॅट वापरले जात आहेत. नवीन बदल स्वीकारताना वर्तमानपत्रे, टीव्ही, रेडियो या पारंपरिक प्रचार पद्धतीही उपयोगी ठरत आहेत. मोठमोठे होर्डिंग्ज लागत आहेत. मोबाईल, मेसेजेस इत्यादींचे महत्त्व वाढले आहे. फेस्टिव्हल्स, सिने महोत्सवांमध्येही प्रमोशन होत आहे. जास्तीत जास्त लोकांपर्यंत सिनेमा पोहोचत आहे. सोशल मीडियाचे महत्त्व खूप वाढले आहे. - गणेश गारगोटे (माध्यम समन्वयक, मीडिया वन)..........................कलाकारांनी आपल्या सिनेमांमध्ये अंतर ठेवायला हवे. एका मागोमाग एक सिनेमे येता कामा नयेत. प्रमोशन स्ट्रॅटेजी ठरवायला हवी. घाई गडबडीत काम करता कामा नये. खूप दिवस काम करून चित्रपटाबाबतची इन्फर्मेशन प्रेक्षकांपर्यंत झिरपत जाईल याची काळजी घेतली गेली तर कोणताही सिनेमा प्रेक्षकांपर्यंत सहजगत्या पोहोचेल आणि सिनेमागृहांमध्ये नक्कीच गर्दी होईल. - विनोद सातव (संचालक, लीड मीडिया)...........................कोणताही सिनेमा प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्यासाठी प्रमोशान हा खूप महत्त्वाचा फॅक्टर आहे. चित्रपटाच्या घोषणेपासून प्रदर्शित झाल्यानंतर प्रेक्षकांच्या प्रतिक्रियांपर्यंत प्रत्येक लहान-सहान गोष्टींद्वारे केलेले प्रमोशन चित्रपट पोहोचवण्यासाठी पूरक ठरते. नवनवीन तंत्रासोबत पारंपरीक पद्धतीच्या प्रमोशनचे महत्त्व लक्षात घेणे गरजेचे असते. निर्मात्यांनी चित्रपटाकडे प्रोडक्ट म्हणून पहायला हवे. - अजय पंदीरकर (संचालक, मॅजिक मीडिया)