Kunal Kamra Controversy: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबाबत 'ठाणे कि रिक्षा' हे विडंबनात्मक गाणं तयार करुन स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामराने त्यांच्यावर टीका केली होती. त्यानंतर कुणाल कामराच्या अडचणीत मोठी वाढ झाली होती. त्याच्यावर राज्यातील विविध ठिकाणी गुन्हे दाखल करण्यात आले. त्यानंतर शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांने कामराला फोन करत धमकी दिली होती. कुणालने तो तामिळनाडूमध्ये असल्याचं सांगितल्यावर तमिळनाडू कसं पोहोचायचं भाऊ? ( 'तमिलनाडू में कैसे पहुंचेगा भाई') असं शिंदे गटाच्या कार्यकर्त्याने म्हटलं होतं. शिंदे गटाचा कार्यकर्ता आणि कुणाल कामराची ही ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आणि अनेक मिम्स व्हायरल झाले. अशातच आता प्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेते प्रकाश राज यांनी शिंदेंना डिवचल्याचं पाहायला मिळालं.
कुणाल कामराची प्रसिद्ध प्रकाश राज यांनी भेट घेतली. त्यांनी कुणालसोबतचा फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला. फोटोसोबत प्रकाश राज यांनी खोचक कॅप्शन देखील दिले आहे. "तमिळनाडू कसं पोहोचायचं भाऊ? सिम्पल ऑटोने" असं म्हटलं. फोटोमध्ये प्रकाश राज आणि कुणाल कामरा यांनी सारख्याच रंगाचं शर्ट परिधान केल्याचं दिसतंय. हिंदी आणि दक्षिणेतील चित्रपटांमध्ये कधी खलनायक तर कधी कॉमिक पात्र साकारणारे प्रकाश राज सरकारविरुद्ध बोलून चर्चेत राहतात. ते कायम निर्भयपणे आपले विचार व्यक्त करत असतात. आता पुन्हा ते फोटोला दिलेल्या कॅप्शमुळे चर्चेत आले आहेत.
कुणालने २०१७ मध्ये 'शटअप कुणाल' हा कॉमेडी शो सुरु केला होता. 'शटअप कुणाल' या कॉमेडी शोमुळेच त्याला सर्वात जास्त प्रसिद्ध मिळाली होती आणि सोशल मीडियावर तो पॉप्युलर झाला होता. त्यावेळी युट्यूब चॅनेलच्या माध्यमातून कुणालने ज्येष्ठ पत्रकार रवीश कुमार, दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरवील, एमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवैसी, उमर खालीद, कन्हैय्या कुमार, जिग्नेश मेवानी अशा दिग्गज मंडळींच्या मुलाखती घेतल्या होत्या.
कुणाल याआधीही वादात अडकला होता. पत्रकार अर्णब गोस्वामी याच्याबरोबरही कुणाल कामराचा वाद झाला होता. कुणालच्या संपत्तीबद्दल बोलायचं झालं तर भारतीय चलनानुसार त्याची संपत्ती १ ते ६ कोटींच्या दरम्यान आहे. आता एकनाथ शिंदे यांच्यासोबत झालेल्या वादात कुणालने हार मानली नसून तो सोशल मीडियावर सतत पोस्ट आणि व्हिडीओ शेअर करताना दिसत आहे. तसेच याप्रकरणी माफी मागणार नसल्याचेही त्याने स्पष्ट केले.