Join us

प्राजक्ता माळीने या कारणामुळे केली १२ ज्योतिर्लिंगाची यात्रा, म्हणाली - "देवाने माझ्याकडून..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 11, 2025 11:51 IST

Prajakta Mali : अभिनेत्री प्राजक्ता माळी हिने नुकतेच १२ ज्योतिर्लिंगाची यात्रा पूर्ण केली. तिच्या वाढदिवसादिवशी तिने भीमाशंकराचे दर्शन घेतले आणि तिची बारा ज्योतिर्लिंग यात्रा पूर्ण केली.

अभिनेत्री प्राजक्ता माळी (Prajakta Mali) हिने नुकतेच १२ ज्योतिर्लिंगाची यात्रा पूर्ण केली. तिच्या वाढदिवसादिवशी तिने भीमाशंकराचे दर्शन घेतले आणि तिची बारा ज्योतिर्लिंग यात्रा पूर्ण केली. ही यात्रा करण्यामागचं कारण नुकतेच तिने सांगितले. व्हिडीओ शेअर करत तिने तिच्या आवडतं ज्योतिर्लिंग, अवघड ज्योतिर्लिंगाबद्दल सांगितले.

प्राजक्ता माळीने सांगितले की, "मी बालपणापासून भरतनाट्यम शिकते आहे. त्यात देवांवर आधारित इतक्या रचना नाचते आहे. त्यातील ७५ टक्के रचना या भगवान शिवांवर आधारित होत्या. नृत्याची देवता नटराज म्हणजेच शिवा. मला जे अध्यात्मिक गुरू मिळाले त्यांचं नावही रवीशंकर आहे. अशा अनेक गोष्टींमुळे ते डोक्यात होते. त्यामुळे मलाही माहिती नव्हते की हे करायचं आहे. देवाने माझ्याकडून ही गोष्ट घडवून घेतलीय, असं मला वाटतं."

प्राजक्ताने पुढे सांगितले की, "सगळ्याच ज्योतिर्लिंगाना तितकेच महत्त्व आहे. ती सगळी शक्तीस्थळे आहेत. खूप पॉवरफुल आहे. एखादे आपले आवडते असते. माझे आ़वडते ठिकाण आहे उज्जैन महाकाल. बारा ज्योर्तिलिंग आहेत तशा बारा राशी देखील आहेत. माझ्या राशीनुसार, माझं ज्योर्तिलिंग महाकाल आहे." सर्वात अवघड ज्योतिर्लिंगाबद्दल प्राजक्ता म्हणाली की, "केदारनाथ. कारण तिथले वातावरण. तिथे जाण्याच्या व्यवस्था. हेलिकॉप्टर्स आहेत पण खूप बेभरवशाचे आहेत. सुरक्षित आहेत पण दुरून कुठून तरी आहेत. पण ते फार महाग आहे. तुम्हाला पायी ट्रेक करावा लागतो, खेचर घ्यावा लागतो किंवा पालखी घ्यावी लागते. तरीही तुम्हाला खूप त्रास होतोच. सुसह्य यात्रा नाही. वर्षातले काही काळ ती यात्रा चालू असते. त्यात अनंत अडचणी असतात." प्राजक्ता माळीने महाराष्ट्रातील सगळीच ज्योतिर्लिंग करायला चाहत्यांना सांगितलं. तिला त्र्यंबकेश्वर प्रचंड आवडत असल्याचे सांगितले.

टॅग्स :प्राजक्ता माळीज्योतिर्लिंग