Anant Mahadevan Meet Raj Thackeray: थोर समाजसुधारक महात्मा जोतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर आधारित 'फुले' हा चित्रपट ट्रेलर प्रदर्शित झाल्यापासून वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. चित्रपटातील काही दृश्यांवर सेन्साॅर बोर्डाने आक्षेप घेतला आहे. तसेच ब्राह्मण समाजाचं कलंकित चित्रण केल्याचा आरोप ब्राह्मण संघटनांनी केला. या संपुर्ण वादात दिग्दर्शक अनंत महादेवन यांनी मनसे प्रमुख राज ठाकरे यांची भेट घेतली जेणेकरून काही निष्कर्ष काढता येईल. राज ठाकरेंच्या भेटीनंतर प्रसार माध्यमांशी संवाद लवकरच चित्रपट प्रदर्शित होईल अशी प्रतिक्रिया दिग्दर्शक अनंत महादवेन यांनी दिलीय. तर बिनधास्त चित्रपट रिलीज करा, असं म्हणत मनसे नेत्या शालिनी ठाकरेंनी चित्रपटासंर्दभात मनसेची भूमिका जाहीर केली आहे.
राज ठाकरे यांच्या भेटीनंतर दिग्दर्शक अनंत महादेवन म्हणाले, "त्यांनी ट्रेलरमध्ये दाखवलेली सर्व गोष्टी या योग्य असल्याचं म्हणत राज ठाकरेंनी आम्हाला प्रोत्साहन दिलं. जे इतिहासात घडलंय, तेच या चित्रपटात दाखवण्यात आलं आहे. त्यामुळे कोणताही बदल न करता चित्रपट लवकर प्रदर्शित करावा, अशी ठाम भुमिका राज ठाकरेंनी मांडल्याचं अनंत महादेवन यांनी सांगितलं. अनंत महादेवन पुढे म्हणाले, "राज ठाकरे आणि इतर सर्वांच्या आशिर्वादानं आम्ही येत्या २५ एप्रिल २०२५ रोजी चित्रपट प्रदर्शित करणार आहोत".
प्रसार माध्यमांशी बोलताना महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट कर्मचारी सेनेच्या कार्याध्यक्षा शालिनी ठाकरे म्हणाल्या, "चित्रपटात खरा इतिहास दाखवला असेल तर काहीच बदल करायची गरज नाही. बिनधास्त चित्रपट प्रदर्शित करा. महापुरुषांना जातीच्या राजकारणात का आणत आहात असं राज ठाकरेचं स्पष्ट मत आहे. घडलेला इतिहास बदलू शकत नाही. तो पुढच्या पीढीला दाखवणे गरजेचे आहे". दरम्यान, आता 'फुले' चित्रपट नव्या तारखेनुसार चित्रपट २५ एप्रिलला प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात प्रतिक गांधी (Pratik Gandhi ) आणि पत्रलेखा (Patralekha) प्रमुख भूमिकेत आहेत. गेल्या कित्येक वर्षांपासून या सिनेमाचं काम सुरू होतं.