राम कपूरकडे नव्हतं काम, पत्नी गौतमीने सांभाळलं घर; सांगितला लग्नानंतरचा अत्यंत कठीण काळ
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2026 18:28 IST
1 / 12अभिनेता राम कपूर आज टेलिव्हिजन आणि बॉलिवूड इंडस्ट्रीतील सर्वात मोठ्या चेहऱ्यांपैकी एक मानला जातो. त्याच्या कामाचं प्रचंड कौतुक होतं. 'कसम से' आणि 'बडे अच्छे लगते हैं' सारख्या मालिकांमुळे त्याला घराघरात ओळख मिळाली.2 / 12करिअरमध्ये एक काळ असाही होता, जेव्हा त्याच्याकडे अजिबात काम नव्हतं. त्यावेळी त्याच्या वैवाहिक जीवनावरही याचा वाईट परिणाम झाला होता. राम कपूरची पत्नी गौतमी कपूरने त्यांच्या लग्नानंतरच्या सर्वात कठीण काळाची आठवण सांगितली.3 / 12सिद्धार्थ कन्ननशी बोलताना गौतमी म्हणाली, 'लग्नानंतर सर्वात कठीण काळ तो होता, जेव्हा राम अनेक वर्षे काम करू शकला नाही आणि मला पुन्हा टीव्हीवर परतावं लागलं. एका पुरुषासाठी हे खूप कठीण असतं.'4 / 12'मला वाटतं की पुरुषांची मानसिकता अशीच बनलेली असते की त्यांना कामावर जावंच लागतं. त्यांना कुटुंबाचा सांभाळ करायचा असतो आणि रक्षक बनायचं असतं. प्रत्येकजण पुरुषाकडे याच दृष्टिकोनातून पाहतो. हो, आता गोष्टी हळूहळू बदलत आहेत, पूर्वीसारखी परिस्थिती आता राहिलेली नाही.'5 / 12'तो जवळपास अडीच वर्षे घरीच होता आणि त्याच्यासाठी हा काळ खरंच खूप कठीण होता. मी त्याची अस्वस्थता आणि भीती स्पष्टपणे पाहू शकत होते. कारण त्या काळात मी स्वतः नोकरीवर जात असे. सकाळी ९ वाजता घराबाहेर पडायचे आणि रात्री १०-११ वाजता घरी परतत असे.'6 / 12'माझ्यासाठी हे समजून घेणं खूप कठीण होतं की, तो दिवसभर घरी असाच बसून असायचा, काहीही न करता फक्त एका चांगल्या संधीची आणि करिअर पुन्हा सावरण्याची वाट पाहायचा.'7 / 12गौतमी पुढे म्हणाली, 'ही गोष्ट मुलं होण्यापूर्वीची आहे. त्या काळात माझा घराशी संपर्क पूर्णपणे तुटला होता आणि तो घरीच असायचा. आम्हा दोघांनाही काय चाललं आहे हे समजत नव्हतं.'8 / 12'मी घरी यायची, झोपायची आणि सकाळी पुन्हा कामावर निघून जायची. त्यामुळे आमच्यात कोणताही संवाद होत नसे. हळूहळू ते प्रेमातील चैतन्य, तो उत्साह... हे सर्व आम्ही गमावून बसलो. कारण मी माझ्या नोकरीत व्यग्र होते आणि तो घरी होता.'9 / 12'जेव्हा मुलं झाली, तेव्हा रामचं करिअर पुन्हा रुळावर आलं. सर्व काही बदललं, नातं सुधारलं आणि सर्व ठीक झालं. मात्र मुलं झाल्यानंतर आणि मी ज्या प्रकारची आई बनले, त्यात मी हे विसरले की मी केवळ एक आईच नाही, तर पत्नी देखील आहे.'10 / 12'मी मुलांच्या संगोपनात स्वतःला इतकं झोकून दिलं की, मुलं सोडून पतीसोबतही माझं एक वेगळं नातं आहे, हेच मी विसरले. रामने मला हे कधीच बोलून दाखवलं नाही, पण मला खात्री आहे की त्याला आतून खूप एकाकी वाटत असावं.'11 / 12'रामला कदाचित वाटलं असेल की त्याची जोडीदार म्हणजे मी आता पूर्वीसारखी राहिले नाही... एक रितेपण त्याला जाणवत असावं.'12 / 12राम कपूर आणि गौतमी कपूर यांचं लग्न २००३ मध्ये झालं होतं. हा प्रेमविवाह होता. दोघांची भेट एका मालिकेच्या सेटवर झाली होती, जिथे आधी त्यांची मैत्री झाली आणि पुढे त्या मैत्रीचे रूपांतर प्रेमात झालं.