Join us
Daily Top 2Weekly Top 5

'शोले'तील सांभा आठवतोय? खलनायकाच्या भूमिकांतून पाडली छाप, रवीना टंडनसोबत आहे खास कनेक्शन, तुम्हाला माहितीच नसेल

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 24, 2026 15:23 IST

1 / 9
बॉलिवूडमधील ७० च्या दशकात प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारा चित्रपट म्हणजे ‘शोले’. रमेश सिप्पी दिग्दर्शित या चित्रपटाने रुपेरी पडद्यावर १०० दिवस आपली जादू कायम ठेवली होती. त्यामुळे हा चित्रपट ऐतिहासिक ठरला.
2 / 9
या चित्रपटातील जय-वीरू,बसंती-गब्बर आणि तसेच ठाकूर यांच्याप्रमाणे एका पात्राने देखील प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतलं होतं त्या पात्राचं नाव म्हणजे सांभा.अत्यंत कमी संवाद असणारा पण त्यातही आपल्या स्क्रीन प्रेझेन्समुळे सीनमध्ये जिवंतपणा आणणारा अभिनेते म्हणजेच मॅक मोहन.
3 / 9
मोहन यांना लहानपणापासूनच क्रिकेटची प्रचंड आवड.त्यांना भविष्यात क्रिकेटर व्हायचं होतं. आपलं हेच स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्यांनी मुंबई गाठली.
4 / 9
मुंबईला आल्यावर घरुन मिळालेल्या पैशांवर गुजराण करणे शक्य नव्हते म्हणून उपजिविकेसाठी काही काम शोधणे गरजेचे होते.त्यावेळी एका मित्राने मोहन यांना नाटकात काम करण्याचा सल्ला दिला. इलेक्शन का टिकट या नाटकातून त्यांनी कलाक्षेत्रात एन्ट्री केली.
5 / 9
त्यानंतर त्यांना लागोलाग हकीकत या चित्रपटात काम मिळाले. हळूहळू मॅकमोहन यांची अभिनयाप्रती रुची वाढू लागली, त्यांनी क्रिकेटर होण्याचा विचार सोडून दिला व अभिनय हेच आपले कार्यक्षेत्र म्हणून निवडलं.
6 / 9
मॅकमोहन यांचा जन्म 24 एप्रिल 1938 ला अखंड भारतातील कराची (पाकिस्तानात) येथे झाला. मॅकमोहन यांची अजून एक ओळख म्हणजे अभिनेत्री रविना टंडन हिचे ते मामा आहेत. मॅकमोहन यांचं मूळ नाव मोहन माखीजानी आहे.तर वडील ब्रिटीश आर्मीमध्ये कर्नलपदावर कार्यरत होते.
7 / 9
आपल्या ४६ वर्षांच्या सिनेकारकिर्दीत त्यांनी १७५ चित्रपटांतून भूमिका केल्या. त्यात त्या काळातील आघाडीवर असणार्‍या सर्वच दिग्दर्शकांच्या चित्रपटात त्यांनी काम केले होते. डॉन, कर्ज, सत्ते पे सत्ता, काला पत्थर, रफू चक्कर, शान, शोले या चित्रपटातील त्यांच्या भूमिका खास लक्षात राहिल्या.
8 / 9
२०१० साली मॅकमोहन यांची अतिथी तुम कब जाओगे या चित्रपटाचे चित्रीकरण सुरु असताना तब्येत खराब झाली. त्यांना तातडीने कोकिलाबेन धीरुभाई अंबानी रुग्णालयात दाखल करण्यात आले. बरेच दिवस उपचार घेतल्यानंतरही त्यांची प्रकृती खालावत गेली. एक वर्षांच्या उपचारानंतर १० मे २०१० रोजी मॅकमोहन यांनी जगाचा निरोप घेतला.
9 / 9
मॅक मोहन यांच्या पत्नीचे नाव मिनी माखिजानी. त्यांना दोन मुली आणि एक मुलगा. मोठी मुलगी मंजिरी याच क्षेत्रात रायटर, डायरेक्टर आणि प्रोड्युसर म्हणून कार्यरत आहे, तर विनाती ही मुलगी हिंदी चित्रपट अभिनेत्री म्हणून ओळखली जाते.
टॅग्स :रवीना टंडनबॉलिवूडसेलिब्रिटी