छत्रपती संभाजी महाराजांवरील छावा चित्रपट तुफान चालत आहे. तिसऱ्या आठवड्यातही कमालीचा प्रतिसाद मिळत आहे. अशातच बेळगावच्या सीमाभागात लीक झालेली थिएटर कॉपी प्रोजेक्टरवरून दाखविण्यात येत आहे. पोलिसांनी यावर कारवाई केल्याने या गावांत तणाव निर्माण झाला होता.
शनिवारी सायंकाळची ही घटना आहे. छावाची रेकॉर्डेड कॉपी प्रोजेक्टर आणून त्यावरून गावागावात दाखविली जात होती. याची माहिती मिळताच कर्नाटक पोलिसांनी यावर कारवाई केली. बेळगाव शहर, कडोली गाव आणि निप्पाणी भागातील गावांत विविध ठिकाणी अशाप्रकारे सिनेमा दाखविला जात होता.
पोलिसांनी हे शो रोखल्याने तणाव निर्माण झाला होता. पोलिसांना लोकांच्या रोषाचा सामना करावा लागला. कडोली येथील एका गल्लीत पोलिसांना या आयोजकांना समजाविण्यासाठी चार तास प्रयत्न करावे लागल्याचे समोर आले आहे. निप्पाणी शहरात आयोजकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बेळगाव शहरात उत्साही युवा संघटनांच्या कार्यकर्त्यांनी ट्रॅक्टर ट्ऱॉलींचा वापर केला आहे. या ठिकाणी रेकॉर्ड केलेला चित्रपट दाखविण्यात आला तसेच पथनाट्यही करण्यात आले. बेळगावमधील चार चित्रपट गृहांमध्ये छावा प्रदर्शित झाला आहे. तरीही गावागावात अशा प्रकारे हा चित्रपट दाखविला जात आहे. पोलिसांच्या परवानगीशिवाय असे शो आयोजित केल्याने आम्ही ते रोखल्याचे पोलिस आयुक्तांनी सांगितले आहे.
बेळगाव हा भाग मराठी बहुल आहे. या भागात शिवजयंती मोठ्या प्रमाणावर साजरी केली जाते. शिवभक्तही मोठ्या प्रमाणावर आहेत. या भागात सैन्यात जाणाऱ्यांची संख्याही मोठी आहे. शिवजयंतीवेळी मोठमोठे देखावे केले जातात, तसेच या देखाव्यांच्या रॅलीचेही आयोजन केले जाते. यामुळे या भागात अशा प्रकारे छावा चित्रपट दाखविण्यात येऊ लागला आहे.