Join us

'मोबाईलच्या रिचार्जपेक्षा कमी किंमत देता', 'फॅन्ड्री' फेम अभिनेत्रीने समाजातील 'त्या' महिलांबद्दल लिहिली भावनिक पोस्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 4, 2021 15:20 IST

अभिनेत्री राजेश्वरी खरातची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसते आहे.

अभिनेत्री राजेश्वरी खरातचा फॅन्ड्री हा पहिला चित्रपट खूप गाजला होता. नागराज मंजुळे यांच्या या चित्रपटामुळे तिला खूप प्रसिद्धी मिळाली होती. या चित्रपटामुळे तिला अनेक कामे देखील मिळाली. नुकताच तिचा रेडलाईट एक विदारक सत्य ही शॉर्ट फिल्म देखील रिलीज होत आहे. युट्युबवर देखील तुम्हाला ती पाहायला मिळणार असल्याचे बोलले जात आहे. या चित्रपटात राजेश्वरी खरात ही रेडलाईट एरियामधील वेश्या व्यवसाय करणाऱ्या महिलेच्या भूमिकेत पाहायला मिळणार असल्याचे दिसते आहे. नुकतीच राजेश्वरीने तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर एक पोस्ट शेअर केली आहे जी आता खूपच व्हायरल होताना पाहायला मिळतेय.

अभिनेत्री राजेश्वरी खरातने इंस्टाग्रामवर फोटो शेअर करत लिहिले की, तो आला, बसला आणि गेला पण सर्वांच्या नजरा मात्र तिच्यावरच अडल्या. स्त्रीने असे काम करणे योग्य नव्हे परंतु पुरुषाने केलेले अतिउत्तम. काही काम धंदा का करीत नाहीस, फक्त पैश्यांसाठी लाचारीचे सोंग घेतीस. पण तुम्ही तुमच्या घरात धुणे भांड्याचे तरी काम देताल का एवढेच सांगा आणि जरी काम दिले तरी त्या मागचा हेतू हा सर्वांनाच माहिती असतो. 

तिने पुढे म्हटले की, गल्लीकडे येताना तोंड लपवून येतात पण येतात मात्र नक्की. थोडावेळासाठीचे खेळणे घेतल्यासारखे आमची आबरू काढून घेता आणि मोबाईलच्या रिचार्ज पेक्षा कमी किंमत देता. सर्वांना हे खेळणे आयुष्यात एकदातरी पाहिजे असतेच पण कोणी याला कायमच आपलं करून घेण्याची हिम्मत ठेवतात का? नाही, कारण वेश्या व्यवसाय करणारी स्त्री चारित्र्यहीन असते आणि बाकीचे सर्व अगदीच पवित्र असतात. समाजात आणखी बर्‍याच काही गोष्टी वेश्येबद्दल बोलल्या जातात पण कोणी मात्र कधी त्यांच्या हितात बोलत नाही, सर्वजण फक्त ऐकून मजा घेतात. कृपया थोडीफार दया त्यांच्यावरही करा ज्या आपल्या घरातील माता भगिनींसारखे आयुष्य कधीच जगू शकत नाहीत.

टॅग्स :राजेश्वरी खरात