Join us
Daily Top 2Weekly Top 5

Pathaan Movie : पठाणच्या तिकिटांची किंमत ऐकून अंगावर येईल काटा ! अव्वाच्या सव्वा किंमती तरी बुकिंग फुल

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 23, 2023 13:01 IST

रिलीजआधीच पठाणची तिकीटविक्री जोरात सुरु असून पहिल्याच दिवशी पठाण धुमाकूळ घालणार असंच चित्र दिसतंय.

Pathaan Movie : शाहरुख खानचा (Shahrukh Khan) 'पठाण' सिनेमा प्रदर्शित होण्यास आता दोनच दिवस आहेत. चाहत्यांची उत्सुकता प्रचंड ताणली आहे. रिलीजआधीच पठाण ची तिकीटविक्री जोरात सुरु असून पहिल्याच दिवशी पठाण धुमाकूळ घालणार असंच चित्र दिसतंय. ४ वर्षांनंतर शाहरुख ला पडद्यावर तेही अॅक्शन भूमिकेत पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत. दरम्यान पठाण च्या तिकीट किंमती अक्षरश: गगनाला भि़डल्याचं दिसतंय. 

शाहरुख खानसाठी चाहते कोणत्याही थराला जाऊ शकतात. कोणी पूर्ण थिएटरच बुक केल्याचं बघायला मिळालं तर कुठे हजारो चाहते एकत्र येत सिनेमा बघण्याच्या तयारित आहेत. जिकडे तिकडे किंग खानच्या पठाणचीच हवा आहे. अर्थात याचा फायदा थिएटर चालकांना होतोय. पठाणची तिकीटं अव्वाच्या सव्वा किंमतीत विकली जात आहेत.

तब्बल 2400 रुपयांना विकली गेली तिकीटं

२० जानेवारी पासून सिनेमाचे प्रिबुकिंग सुरु झालेले आहे. तिकीटांच्या किंमती अक्षरश: गगनाला भिडल्या आहेत. चाहतेही इतके महागडे तिकीट विकत घेण्यापासून मागे हटताना दिसत नाहीत. हरियाणा येथील गुरुग्रामच्या अॅंबियन्स मॉल मध्ये पठाण ची तिकीटं 2000 रुपये ते 2400 रुपयांपर्यंत विकली जात आहेत. इतके महाग तिकीटं असूनही बुकिंग फुल होत आहेत. हे चाहत्यांच्या किंग खानवर असलेले प्रेमच आहे. सिनेमाच्या वादाचा त्यांच्यावर काहीही परिणाम झालेला नाही. चाहते किंग खानला रुपेरी पडद्यावर बघण्यास आतुर झालेत. फर्स्ट डे फर्स्ट शो साठी चढाओढ बघायला मिळत आहे.

दिल्लीतही जास्त आहेत तिकीटांच्या किंमती

दिल्लीतील काही मल्टिप्लेक्समध्ये पठाण ची तिकीटं 2100 रुपयांना विकली जात आहेत. तर काही ठिकाणी कमीत कमी 1000 रुपये तिकीटांची किंमत आहे. मात्र असं असतानाही शाहरुखचा पठाण अॅडव्हान्स बुकिंग मध्ये रेकॉर्ड तोडत आहे. तेलुगू डब साठीही प्रेक्षक चांगला प्रतिसाद देत आहेत. 

२५ जानेवारी रोजी पठाण प्रदर्शित होत आहे. यासाठी शाहरुख खानने प्रचंड मेहनच घेतलेली दिसते. तसंच ४ वर्षांनंतर तो पडद्यावर दिसणार असल्याने त्याच्यासाठीही सिनेमा खास असणार आहे. शाहरुख आणि दीपिका पदुकोणची जादू पुन्हा पडद्यावर बघायला मिळणार आहे. तर जॉन अब्राहम नकारात्मक भूमिकेत झळकणार आहे. सिनेमात डिंपल कपाडिया आणि आशुतोष राणा यांचीही महत्वाची भूमिका आहे. तसेच सलमान खानचा कॅमिओ बघायला मिळणार आहे.

टॅग्स :पठाण सिनेमाशाहरुख खानतिकिटदीपिका पादुकोणजॉन अब्राहमनाटक