Join us
Daily Top 2Weekly Top 5

अखेर सायना नेहवालच्या बायोपिकमधून श्रद्धा कपूर ‘आऊट’!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 15, 2019 11:43 IST

काही महिन्यांपूर्वी मेकर्सनी या बायोपिकचा फर्स्ट लूक प्रदर्शित केला होता. यात अभिनेत्री श्रद्धा कपूर सायनाच्या भूमिकेत दिसली होती. गतवर्षी श्रद्धाने या बायोपिकसाठी ट्रेनिंगही सुरु केले होते. पण आता सायनाच्या या बायोपिकमधून श्रद्धा ‘आऊट’ झालीय

ठळक मुद्देतूर्तास श्रद्धा ‘छिछोरे’च्या शूटींगमध्ये व्यग्र आहे. याशिवाय वरूण धवनसोबत ‘स्ट्रिट डान्सर’ या चित्रपटातही ती झळकणार आहे. प्रभासचा ‘साहो’ आणि टायगर श्रॉफचा ‘बागी 3’ या चित्रपटातही तिची वर्णी लागली आहे.

सध्या बॉलिवूडमध्ये बायोपिकची धूम आहे. येत्या दिवसांत कपिल देव, पंतप्रधान नरेंद्र मोदी, अंतराळवीर राकेश शर्मा अशा अनेकांच्या आयुष्यावरचे, उपलब्धींवरचे बायोपिक रांगेत आहेत. भारताची फुलराणी अर्थात बॅडमिंटनपटू सायना नेहवाल हिचे बायोपिकही या यादीत आहे. गेल्या अनेक दिवसांपासून या बायोपिकची चर्चा सुरु आहे. काही महिन्यांपूर्वी मेकर्सनी या बायोपिकचा फर्स्ट लूक प्रदर्शित केला होता. यात अभिनेत्री श्रद्धा कपूर सायनाच्या भूमिकेत दिसली होती. गतवर्षी श्रद्धाने या बायोपिकसाठी ट्रेनिंगही सुरु केले होते. पण आता या बायोपिकबद्दल एक ताजी बातमी आहे. ही बातमी वाचून श्रद्धाच्या चाहत्यांना धक्का बसल्याशिवाय राहणार नाही.

होय, सायनाच्या या बायोपिकमधून श्रद्धा ‘आऊट’ झालीय आणि तिच्या जागी परिणीती चोप्रा हिची ‘एन्ट्री’ झालीय. मुंबई मिररने दिलेल्या वृत्तानुसार, स्वत: श्रद्धाने या बायोपिकसाठी नकार दिला. आपल्या बिझी शेड्यूलमुळे तिने या चित्रपटात काम न करण्याचा निर्णय घेतला. या बायोपिकचे निर्माते भूषण कुमार यांनीही या वृत्ताला दुजोरा दिला आहे. ‘आम्हाला याचवर्षी या बायोपिकचे शूटींग पूर्ण करायचे आहे. त्यामुळे आम्ही अतिशय विचारपूर्वक हा निर्णय घेतला. या चित्रपटात परिणीती चोप्रा दिसणार, याचा आम्हाला आनंद आहे. सायना ही देशाचा गौरव आहे. तिची कथा जगाला दाखवण्यास आम्ही उत्सूक आहोत,’ असे त्यांनी सांगितले.

खरे तर या बायोपिकमध्ये श्रद्धा कपूरची एन्ट्री झाल्यापासूनच अनेक कुरबुरी सुरु होत्या. बायोपिकमध्ये श्रद्धाने सायनासारखे अगदी प्रोफेशनल प्लेअर दिसावे, असा सायनाचा अट्टाहास होता. पण काही दिवसांच्या ट्रेनिंगमध्ये कुणी प्रोफेशनल प्लेअर बनेल, हे श्रद्धाला अशक्य वाटत होते. त्यामुळेच माझ्या कामाबद्दल समाधानी नसाल तर दुसरी सोय बघा, असे श्रद्धाने सांगून टाकले होते. अर्थात श्रद्धाचा हा पावित्रा बघून निर्माता- दिग्दर्शकचं नाही तर सायनाही नरमली होती.तूर्तास श्रद्धा ‘छिछोरे’च्या शूटींगमध्ये व्यग्र आहे. याशिवाय वरूण धवनसोबत ‘स्ट्रिट डान्सर’ या चित्रपटातही ती झळकणार आहे. प्रभासचा ‘साहो’ आणि टायगर श्रॉफचा ‘बागी 3’ या चित्रपटातही तिची वर्णी लागली आहे. 

टॅग्स :श्रद्धा कपूरपरिणीती चोप्रासायना नेहवाल