Join us

परिणीती चोप्राचे पती राघव चढ्ढा शस्त्रक्रियेसाठी परदेशात, नेमक्या कोणत्या आजारांचा सामना करतायेत ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 1, 2024 15:54 IST

सध्या परिणितीचे पती राघव हे गंभीर आजाराचा सामना करत आहेत. 

अभिनेत्री परिणीती चोप्रा आणि आम आदमी पार्टीचे नेते राघव चड्ढा हे सध्या सर्वात चर्चेत असणारे सेलिब्रिटी कपल आहे. गेल्या महिन्यात २४ सप्टेंबर २०२३ रोजी एका शाही विवाह सोहळ्यात परिणीती-राघव विवाहबंधनात अडकले. दोघेही एकमेंकावरी प्रेम व्यक्त करण्याची एकही संधी सोडत नाहीत. सध्या परिणितीचे पती राघव हे गंभीर आजाराचा सामना करत आहेत. 

अरविंद केजरिवाल यांच्या अटकेनंतर देखील राघव माध्यमांमध्ये दिसून आले नाहीत. तसेच लोकसभा निवडणुकीच्या रिंगणातून गायब आहेत.यातच माहिती समोर आली आहे की राघव हे विदेशात असून उपचार घेत आहेत. राघव चढ्ढा डोळ्याची 'रेटिना डिटेचमेंट' टाळण्यासाठी व्हिट्रेक्टोमी सर्जरीसाठी ब्रिटनला गेले आहेत. जर इतक्यात शस्त्रक्रिया झाली नसती तर त्यांना काहीही दिसू शकले नसते. ही माहिती दिल्ली सरकार मंत्री सौरभ भारद्वाज यांनी दिली. 

राघव हे लवकरच भारतात परतणार असल्याचं म्हटलं आहे. काही दिवसांपुर्वी ते एका वादात अडकले होते. राघव चड्ढा यांनी अलीकडेच यूकेमधील लेबर पार्टीच्या खासदार प्रीत कौर गिल यांची भेट घेतली होती. तसेच त्यांच्या भेटीचे फोटोही गिल यांनी सोशल मीडियावर पोस्ट केले होते. लेबर पार्टीच्या खासदार प्रीत कौर गिल या खलिस्तानसमर्थक मानल्या जातात. मात्र, या भेटीवरून राघव चढ्ढा हे वादाच्या भोवऱ्यात सापडले. या भेटीवरून भाजपानेही चड्ढा यांच्यावर जोरदार टीका केली आहे. 

परिणीतीच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर तिचा इम्तियाज अली दिग्दर्शित 'अमर सिंग चमकीला'  हा सिनेमा नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटात परिणीतीने दिलजीत दोसांझसोबत स्क्रीन शेअर केली आहे. या चित्रपटातील परिणीतीच्या अभिनयाचे खूप कौतुक होत आहे. या सिनेमातील विविध पंजाबी गाण्यांना दिलजीत आणि परिणीती या दोघांनीही आवाज दिला आहे. ए आर रहमान यांनी या सिनेमाला संगीत दिले आहे. दरम्यान अमरजोतच्या पात्रासाठी परिणीतीने १५ किलो वजनही वाढवलं होतं. 

टॅग्स :परिणीती चोप्रासेलिब्रिटीबॉलिवूडराजकारण