Join us
Daily Top 2Weekly Top 5

"माझी लाज काढू नका", पॅडी कांबळेने चूक दाखवल्यावर छोटा पुढारीचा मोठा संताप,नेमकं काय घडलं?

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 5, 2024 13:02 IST

बिग बॉस मराठीच्या नवीन सीझनमध्ये पॅडी कांबळे आणि छोटा पुढारी घनःश्याम दरवडेमध्ये खडाजंगी झाली आहे

बिग बॉस मराठीच्या नवीन सीझनमध्ये एक आठवडा उलटून गेलाय. घरातले सदस्य आता हळूहळू बिग बॉसचा गेम समजत आहेत. रितेश देशमुखनेही भाऊचा धक्का म्हणजेच विकेंडच्या वारमध्ये घरातील सदस्यांना चांगलीच समज दिलीय. इतकंच नव्हे जे घरात शांत आहेत त्यांनाही पुढे येऊन खेळण्याचा सल्ला दिला. त्यामुळे घरातल्या सदस्यांमध्ये एक वेगळाच जोश निर्माण झालेला दिसतोय. अशातच बिग बॉसच्या घरात पॅडी कांबळे आणि घनःश्याम पुढारी यांच्यात वाद रंगलेला दिसतोय. 

पॅडीने दाखवली छोटा पुढारीला चूक

झालं असं की, पंढरीनाथ कांबळे म्हणजेच पॅडी अंथरुण घेऊन बाहेर जात होता. तेव्हा तो छोटा पुढारीला म्हणाला, "तुला लाज नाय वाटत. बिग बॉस आपल्याविरुद्ध बोलत आहेत. आपल्याला उद्धट बोलून बिग बॉस आपल्याला सुनावत आहेत. त्याच्यावर तू थापटा मारु नकोस. कारण त्यातला एक कोंबडा तू होतास. तुला काहीतरी वाटायला पाहिजे येड्या. आपल्यामुळे कोंबडा आरवला आहे. तुला काय वाटत नाय?"

छोटा पुढारी पॅडीवर भडकला

पॅडीने सर्वांसमोर लाज काढल्याने छोटा पुढारी चांगलाच भडकलेला दिसला. तो म्हणाला, "हे सिद्ध झालंय की मी झोपलो नव्हतो. पण तुम्ही माझी लाज काढू नका." अशा शब्दात घनःश्यामने पॅडीवर संताप व्यक्त केला. पुढे बिग बॉस घनःश्यामला म्हणाले, "आपण जरी झोपला नसाल तरी कोण झोपलंय याच्याकडे आपले डोळे उघडे पाहिजेत." पुढे घनःश्याम पॅडीला शेवटी पुन्हा म्हणाला, "हे आधी ध्यानात ठेवा एखाद्याची लाज काढण्याआधी." बिग बॉस मराठीचा हा नवीन भाग तुम्हाला आज रात्री ९ वाजता बघायला मिळेल.

टॅग्स :बिग बॉस मराठीरितेश देशमुखकलर्स मराठी