Join us  

"नुस्त्या नजरंतनं जाळ न् धूर संगटच काढायचास!", इरफान खानसाठी किरण मानेंची खास पोस्ट

By ऑनलाइन लोकमत | Published: August 08, 2023 1:44 PM

Kiran Mane : किरण माने यांनी सोशल मीडियावर बॉलिवूडमधील प्रसिद्ध दिवंगत अभिनेता इरफान खानसाठी खास पोस्ट शेअर केली आहे.

टेलिव्हिजनवरील प्रसिद्ध अभिनेता किरण माने (Kiran Mane) सतत कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत येत असतात. त्यांना खरी लोकप्रियता बिग बॉस मराठी(Bigg Boss Marathi)च्या घरातून मिळाली. ते सोशल मीडियावर सक्रीय असून तिथे ते रोखठोक भूमिका मांडत असतात. तसेच त्यांच्या आजूबाजूला घडणाऱ्या घटनांवर आपले मत मांडत असतात. दरम्यान आता त्यांनी बॉलिवूडमधील प्रसिद्ध दिवंगत अभिनेता इरफान खान(Irfan Khan)साठी खास पोस्ट शेअर केली आहे.

किरण माने यांनी इंस्टाग्रामवर इरफान खानचे दोन फोटो शेअर करत लिहिले की, भावा, तुझे डोळे...एखाद्या गहिर्‍या डोहासारखे होते रं ! आजबी रूतून बसलेत काळजात. आयुष्यभर रहातील तिथंच वस्तीला... तू लहान असताना तुझे वडील तुला पाहुन म्हनायचे "ये ऑंखे नहीं. 'जाम' है भरे हुए" उफ्फ्फ!एक 'अभिनय' सोडला तर मला दुनियादारी म्हाईत नाय. त्यामुळं बाकीच्या फकांड्या मारत नाय. अभिनेता म्हनून एकच कळतं... एखादं उत्तम लिहीलेलं 'कॅरॅक्टर' नखशिखान्त मुरवून घेनं... भिनवून घेनं... 'आतल्या' - मनामेंदूतल्या महासागरात चालनार्‍या भरती-ओहोटींसकट देहबोलपर्यन्त साकारनं... हे लै लै लै मोठ्ठं - अवाढव्य काम असतं. खायचं काम नाय हे.पन तू? हे एवढा मोठ्ठ्ठा अभिनयाचा भव्य हिमनग निव्वळ नुसत्या डोळ्यांवर पेलून धरायचास राव ! नादखुळा.. भिरकीट... नुस्त्या नजरंतनं जाळ न् धूर संगटच काढायचास !

"सगळ्या चाकोर्‍यांवरनं जेसीबी फिरवलास..."त्यांनी पुढे म्हटले की, बाॅलीवूड-हाॅलीवूड सकट सगळी दुनिया पागल केलीस बहाद्दूरा... सगळ्या जगावर गारूड केलं तुझ्या त्या दोन जादूभर्‍या - दर्दभर्‍या डोळ्यांनी ! 'मकबुल' असो नायतर 'मदारी'... 'पान सिंग तोमर' असो नायतर 'पिकू'... लंचबाॅक्स,नेमसेक,लाईफ ऑफ पाय,लाईफ इन मेट्रो,हासिल... तुला मिळालेल्या भुमिकेची अख्ख्खी जिंदगी 'निचोड'कर तू त्या डोळ्यांत भरायचास आनी आमच्यासमोर आनून ओतायचास... तू अभिनयाबाबतीत सगळ्या जुन्यापान्या जळमटांवरनं झाडू फिरवलास. सगळ्या चौकटींवरनं बुलडोझर फिरवुन चक्काचूर केलास. सगळ्या चाकोर्‍यांवरनं जेसीबी फिरवलास.

गांवखेड्यातनं आलेल्या - 'स्माॅलटाऊन' - साधारन चेहर्‍याच्या पन अभिनयाची अफाट - अचाट 'पॅशन' असलेल्या पुढच्या पिढ्यांसाठी तू आता एव्हरेस्टसारखा उभा आहेस... तुझे ते जादूई दोन डोळे या जगात नाहीत पण कुठूनतरी अशा अभिनेत्यांवर नजर ठेवून आहेत... एखाद्या सावलीसारखे...इरफान, काल 'मकबुल' परत एकदा बघितला... परत एकदा काळजात कालवाकालव झाली... परत एकदा मेंदूतून झिणझिण्या आल्या... तस्साच नखशिखान्त हादरलो... आणि परत एकदा डोळे पाणावले... तुझी लै लै लै आठवण आली. मिस यू. लब्यू भावा, असे त्यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.

टॅग्स :किरण मानेइरफान खान