Join us

“नितीन देसाईंवर कोणताही दबाव नव्हता”, कर्ज देणाऱ्या कंपनीचा मोठा दावा, म्हणाले "२५२ कोटींचं कर्ज..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 5, 2023 17:26 IST

Nitin Desai Suicide : नितीन देसाईंवर दबाव नसल्याचा कंपनीचा दावा,

सिनेसृष्टीतील प्रसिद्ध कलादिग्दर्शक नितीन देसाई यांनी बुधवारी(२ ऑगस्ट) गळफास घेत आत्महत्या केली. कर्जतमधील एन.डी. स्टुडिओमध्ये नितीन देसाईंचा मृतदेह पंख्याला लटकलेल्या अवस्थेत आढळला. त्यांच्यावर कोट्यवधींचं कर्ज होतं आणि कर्ज वसुलीच्या तगाद्याने त्रस्त होऊन आत्महत्या केल्याचा आरोप देसाईंच्या पत्नीने केला होता. नितीन देसाई यांच्या पत्नीने खालापूर पोलिसांत एडलवाईज ग्रुप आणि इसीएल फायन्सास कंपनीतील अधिकाऱ्यांसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. FIR दाखल झाल्यानंतर देसाईंना कर्ज देणाऱ्या एडलवाईज एआरसी(Edelweiss ARC) कंपनीने याबाबत आता खुलासा केला आहे.

पीटीआयने दिलेल्या वृत्तानुसार, एडलवाईज कंपनीने शुक्रवारी(४ ऑगस्ट) संध्याकाळी याबाबत स्पष्टता दिली आहे. “रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या नियमांचं आम्ही पालन केलं आहे. नितीन देसाईंना २५२ कोटी कर्जाची परतफेड करता आली नाही. परंतु, त्यांच्यावर कोणत्याही प्रकारचा दबाव नव्हता. त्यांना जास्त व्याजदरही आकारण्यात आलेला नव्हता,” असं कंपनीने म्हटलं आहे.

नितीन देसाईंनी अनेक सुपरहिट सिनेमांचे सेट उभारले होते. 'देवदास', 'लगान', 'अजिंठा', 'हम दिल दे चुके सनम', 'जोधा अकबर' यांसारख्या चित्रपटांचं त्यांनी कला दिग्दर्शन केलं होतं. नितीन देसाईंच्या पार्थिवावर एन.डी, स्टुडिओत शुक्रवारी अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या अंत्यदर्शनासाठी मराठीसह बॉलिवूडमधील अनेक कलाकारांनी हजेरी लावली होती.

 

 

टॅग्स :नितीन चंद्रकांत देसाईबॉलिवूड