काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झालेल्या पुष्पा-२ चित्रपटाच्या प्रदर्शनादरम्यान चेंगराचेंगरी होऊन झालेल्या एका महिलेच्या मृत्यूमुळे अभिनेता अल्लू अर्जुन हा अडचणीत सापडला आहे. दरम्यान, अल्लू अर्जुन याने शनिवारी संध्याकाळी ज्युबिली हिल्स येथील आपल्या निवासस्थानी प्रसारमाध्यमांशी संवाद साधत या प्रकरणात पुन्हा एकदा आपली बाजू मांडली. यावेळी अल्लू अर्जुन याने तेलंगाणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी आणि एमआयएमचे आमदार अकबरुद्दीन ओवेसी यांनी विधानसभेत केलेल्या आरोपांना उत्तर दिले. तसेच संध्या थिएटरमध्ये झालेल्या चेंगराचेंगरीच्या घटनेचा उल्लेख करत पीडित कुटुंबीयांना संबोधित केलं. तसेच त्यांचं सांत्वन केलं.
अल्लू अर्जुन म्हणाला, मला त्या मुलाबाबत दर तासाला माहिती मिळते. त्याची प्रकृती सुधारत आहे. हा मुलगा बरा होत आहे, ही चांगली बाब आहे. त्यानंतर त्याने पुढे सांगितलं की, आज प्रसारमाध्यमांशी संवाद साधण्यामागचं मुख्य कारण म्हणजे बरेचसे गैरसमज, चुकीची माहिती आणि चुकीचे आरोप केले जात आहेत. चारित्र्यहनन झाल्यानी मला खूप अपमानित झाल्यासारखं वाटत आहे. खरंतर ही माझ्यासाठी आनंदोत्सव साजरा करावा अशी वेळ आहे. मात्र मागच्या १५ दिवसांपासून मला कुठेही जाता येत नाही आहे. कायद्यानुसार माझे हात बांधले गेले आहेत. मी कुठेही जाऊ शकत नाही.
अल्लू अर्जुन पुढे म्हणाला की, या चित्रपटामध्ये मी मनापासून काम केलं आहे. मी चित्रपटामध्ये जी काही मेहनत केली आहे ती पडद्यावर जाऊन पाहू शकलेलो नाही, असेही अल्लू अर्जुन म्हणाला.