'मुरांबा' ही छोट्या पडद्यावरील अतिशय लोकप्रिय मालिका आहे. या मालिकेला सुरुवातीपासूनच प्रेक्षकांचं भरपूर प्रेम मिळालं. मालिकेतील रमा-अक्षयची जोडी प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली. काही दिवसांपूर्वीच मालिकेने नवं वळण घेतलं होतं. रेवाला धडा शिकवत तिला तुरुंगात टाकल्यानंतर रमा आणि अक्षय एकत्र आले. त्यामुळे मालिका संपणार की काय असा प्रश्न प्रेक्षकांना पडला होता. मात्र, या मालिकेने आता वेगळाच टर्न घेतला आहे.
'मुरांबा' मालिकेचा नवीन प्रोमो समोर आला आहे. सगळं सुरळीत झाल्यानंतर रमा आणि अक्षय हनीमूनसाठी गेल्याचं दाखविण्यात आलं होतं. त्यांच्यामध्ये जवळीक वाढत असतानाच आता मात्र मालिकेत मोठा ट्विस्ट येणार आहे. मालिकेच्या या नव्या प्रोमोनुसार रमाचा अपघात होत असल्याचं दिसत आहे. अक्षयला भेटण्यासाठी येत असलेल्या रमाला कारची धडक बसते आणि ती खोल दरीत कोसळत असल्याचं प्रोमोमध्ये दाखविण्यात आलं आहे. रमाला वाचविण्यासाठी अक्षय प्रयत्न करत असल्याचंही दिसत आहे. मात्र रमा दरीत कोसळते. ते पाहून अक्षयची अवस्था दयनीय झाली आहे.
या मालिकेत अभिनेता शशांक केतकर अक्षयची भूमिका साकारत आहे. तर अभिनेत्री शिवानी मुंढेकर रमाच्या भूमिकेत आहे. मुरांबा मालिकेने नुकतेच ९०० भाग पूर्ण केले आहेत. २०२२ पासून ही मालिका प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे.