Join us
Daily Top 2Weekly Top 5

मुन्नीशी लग्न करण्यासाठी तडफडतोय 'मुंज्या'चा आत्मा! सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित, मराठी कलाकारांची फौज

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 24, 2024 15:15 IST

'मुंज्या' सिनेमाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या ट्रेलरमध्ये मराठी कलाकारांची फौजही पाहायला मिळत आहे. 

'मुंज्या' हा नवा बॉलिवूडमधील हॉरर सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. काही दिवसांपूर्वीच या सिनेमाचा झोप उडवणारा टीझर प्रदर्शित करण्यात आला होता. टीझरनंतर या सिनेमाबाबत प्रेक्षकांची उत्सुकता वाढली होती. मुंज्या आणि मुन्नीचं नेमकं काय कनेक्शन आहे? हे जाणून घेण्यासाठी प्रेक्षक उत्सुक होते. आता 'मुंज्या' सिनेमाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या ट्रेलरमध्ये मराठी कलाकारांची फौजही पाहायला मिळत आहे. 

आदित्य सरपोतदार या मराठमोळ्या दिग्दर्शकाच्या 'मुंज्या' या हॉरर सिनेमाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित करण्यात आला आहे. २.१८ मिनिटांच्या या सिनेमाच्या ट्रेलरमधून मुंज्या आणि मुन्नीमधील कनेक्शनही प्रेक्षकांसमोर आलं आहे. मुन्नीच्या प्रेमात वेड्या झालेल्या मुंज्याची तिच्याशी लग्न करण्याची इच्छा अपूर्ण राहते. लग्नाआधीच त्याचा मृत्यू होतो. त्याच्या अस्थी जिथे असतात ते झाड शापित होतं आणि त्या झाडावर मुंज्याची आत्मा असल्याचं ट्रेलरमध्ये पाहायला मिळत आहे. जंगलातील त्या झाडाजवळ गेलेल्या एका मुलाला मुंज्या झपाटतो. आणि त्याच्याबरोबर मुन्नीला शोधायला शहरात येत असल्याचं ट्रेलरमध्ये दाखविण्यात आलं आहे. 

'मुंज्या' सिनेमाचा भयानक ट्रेलर पाहून अंगावर काटा आल्याशिवाय राहत नाही. मुंज्याने आपल्या मुलाची पाठ सोडावी यासाठी त्याची आजी आणि आई प्रयत्न करत असल्याचंही ट्रेलरमध्ये पाहायला मिळत आहे. आता खरंच मुंज्याला त्याची मुन्नी मिळणार का? हे जाणून घेण्यासाठी हा सिनेमा पाहायला हवा. मुंज्या सिनेमाच्या ट्रेलरमध्ये मराठी कलाकारांची फौज पाहायला मिळत आहे. या सिनेमात अभय वर्मा, शर्वरी वाघ, मोना सिंग यांच्या मुख्य भूमिका आहेत. तर सुहास जोशी, रसिका वेंगुर्लेकर, भाग्यश्री लिमये हे कलाकारही महत्त्वाच्या भूमिकेत आहेत.'स्त्री' या सिनेमाचे मेकर्स मॅडॉक फिल्म्सकडून मुंज्या सिनेमाची निर्मिती करण्यात आली आहे.  ७ जूनला हा सिनेमा सर्वत्र प्रदर्शित होणार आहे. 

टॅग्स :मोना सिंगबॉलिवूडसिनेमासेलिब्रिटी