Join us

चाहत्याने दिलेलं गिफ्ट पाहून स्टेजवरच भडकले कमल हासन, पोलिसांनी केला हस्तक्षेप

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 15, 2025 16:54 IST

चाहत्याच्या 'त्या' गिफ्टमुळे संतापले कमल हासन, व्हिडिओ झाला व्हायरल

सुपरस्टार कमल हासन हे सध्या त्यांच्या 'ठग लाईफ' या चित्रपटामुळे चर्चेत आहेत. हा बहुप्रतिक्षित चित्रपट ५ जून रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला. बॉक्स ऑफिसवर या चित्रपटानं चांगली कमाई केली. चित्रपटाच्या अनेक प्रमोशनल कार्यक्रमांना उपस्थित राहिल्यानंतर कमल हासन हे पुन्हा राजकीय कामाकडे वळाले आहेत. मक्कल निधी मय्यम (एमएनएम) या राजकीय पक्षाचे संस्थापक अध्यक्ष म्हणून पुन्हा  काम सुरू केलं आहे. नुकतंच ते चेन्नईमध्ये पक्षाच्या एका कार्यक्रमात हजर राहिले. यावेळी एका चाहत्यांना अशी एक भेटवस्तू दिली, ज्यामुळे कमल हासन संतापले. या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

कमल हासन यांना चाहत्याने स्टेजवर तलवार (sword) भेट म्हणून दिल्याचं पाहायला मिळालं. पण, ही भेट कमल हासन यांना पसंत पडली नाही. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये दिसतं की,  काही चाहत्यांनी स्टेजवर येऊन कमल हासन यांना एक तलवार भेट म्हणून दिली. सुरुवातीला कमल हासन ती तलवार स्वीकारतात, पण नंतर जेव्हा काहीजण त्यांना त्या तलवारीसह पोझ देण्यास सांगू लागतात, तेव्हा कमल हासन संतापतात.  यावेळी प्रकरण अधिक चिघळू नये म्हणून पोलिसांनी त्वरित हस्तक्षेप केला. संबंधित व्यक्तींकडून तलवार काढून घेतली आणि त्यांना स्टेजवरून खाली उतरवण्यात आलं. त्यानंतर कमल हासन यांनी हात जोडून निरोप घेत कार्यक्रम पूर्ण केला.

कमल हासन यांच्या 'ठग लाईफ' या चित्रपटावरुनही अलिकडेच एक मोठा वाद निर्माण झाला होता. या वादाचं कारण ठरलं, कमल हासन यांनी कन्नड भाषेबाबत केलेलं एक वादग्रस्त विधान. कर्नाटक फिल्म चेंबर ऑफ कॉमर्सने या वक्तव्यावर तीव्र नाराजी व्यक्त करत 'कमल हासन यांनी जर माफी मागितली नाही, तर आम्ही त्यांचा चित्रपट कर्नाटकात प्रदर्शित होऊ देणार नाही', अशी भुमिका घेतली होती. पण, कमल हासन यांनी माफी मागण्यास स्पष्ट नकार दिला, त्यामुळे हा वाद अधिक चिघळला.  

टॅग्स :कमल हासन