Join us
Daily Top 2Weekly Top 5

"तिला तिच्या कर्माचं फळ मिळत आहे...", मिका सिंहने बिपाशा बसूवर साधला निशाणा; कारण काय?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 2, 2025 08:56 IST

बिपाशाला काम का मिळत नाही? मिका सिंहने अभिनेत्रीवर ओढले ताशेरे

बॉलिवूड अभिनेत्री बिपाशा बसू (Bipasha Basu) बऱ्याच काळापासून स्क्रीनवरुन गायब आहे. पती करण सिंह ग्रोवर आणि लेकीसोबत ती संसारात व्यस्त आहे. गायक मिका सिंहसोबत (Mika Singh) करण आणि बिपाशाचा जुना वाद आहे. मिकाने त्याच्या पहिल्या निर्मिती सिनेमात करण-बिपाशाला घेतलं होत. मात्र त्या  दोघांनी तेव्हा खूप नखरे दाखवले होते. आता नुकतंच मिकाने पुन्हा या जोडीवर कमेंट केली आहे. कर्माचं फळ मिळत आहे अशी टिप्पणी त्याने केली आहे.

पिंकव्हिलाला दिलेल्या मुलाखतीत मिकाला विचारण्यात आलं की बिपाशाला काम का मिळत नाही? यावर मिका म्हणाला, "देव सगळं बघत आहे. मला करण खूप आवडायचा. त्याला घेऊन मला सिनेमा प्रोड्युस करायचा होता. याचं बजेट जवळपास ४ कोटी होतं. बिपाशाला मी घेणार नव्हतो पण ती बळजबरी या सिनेमाचा भाग बनली. मला दुसऱ्याच अभिनेत्रीला घ्यायचं होतं. पण बिपाशा स्वत: आली. लंडनमध्ये सिनेमाचं शूट होतं. ४ कोटींचं बजेट १४ कोटींवर गेलं. मला आर्थिक चिंता होती. बजेट वाढण्याचं खरं कारण सेटवर आल्यावर मला कळालं. बिपाशा अजिबातच सहकार्य करत नव्हती. तिचे नखरे पाहून मला निर्मितीमध्ये यायचा पश्चात्ताप होत होता. नवरा बायको असूनही त्यांनी रोमॅन्टिक सीन्स द्यायलाही नकार दिला."

तो पुढे म्हणाला,"यामध्ये एक किसींग सीन होता. हा कथेचाच भाग होता. पण बिपाशाने ऐनवेळी नकार दिला. अमुक करणार नाही तमुक करणार नाही हेच तिचं सुरु होतं. ज्या अभिनेत्रींजवळ काम नाही ते नेहमीच नशिबाला दोष देतात. पण जे काम घेऊन आलेत त्या निर्मात्यांचाही आदर केला पाहिजे. आज तिला तिच्या कर्माचंच फळ मिळत आहे म्हणून घरी बसली आहे."

बिपाशा बसूने २०२० साली 'डेंजरस' ही वेबसीरिज केली होती. हीच सीरिज मिका सिंहने निर्मित केली होती  ज्यात करण सिंह ग्रोवरही होता. त्यानंतर बिपाशा कोणत्याच प्रोजेक्टमध्ये दिसलेली नाही.

टॅग्स :मिका सिंगबिपाशा बासूबॉलिवूडकरण सिंग ग्रोव्हर