Join us
Daily Top 2Weekly Top 5

Sanjeev Sanjeev : तू मला पप्पा म्हण कारण..., सायली संजीवनं सांगितलं अशोक सराफांना ‘पप्पा’ म्हणण्याचं कारण

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 25, 2022 08:00 IST

Sanjeev Sanjeev, AshokSaraf : अशोक सराफ यांना सायली संजीव का म्हणते 'पप्पा'?

सायली संजीव (Sayali Sanjeev) ही मराठी मनोरंजनसृष्टीतील आघाडीची अभिनेत्री. ‘काहे दिया परदेस’ या मालिकेतून तिचा अभिनय प्रवास सुरू झाला आणि यानंतर तिने कधीच मागे वळून पाहिलं नाही. ‘काहे दिया परदेस’ या मालिकेत सायलीने साकारलेली गौरीची भूमिका लोकांना इतकी आवडली की, ही गोड चेहऱ्याची अभिनेत्री सर्वांची आवडती अभिनेत्री बनली. अगदी अशोक सराफ सुद्धा तिच्या गोड चेहऱ्याच्या आणि गोड स्वभावाच्या प्रेमात पडले. 

होय, खुद्द सायलीने एका मुलाखतीत हा खुलासा केला. अनेकांना सायली संजीव ही अशोक सराफ ( Ashok Saraf) आणि निवेदिता सराफ यांची मुलगी असल्याचं वाटतं. तशी ती अशोक सराफ व निवेदिता सराफ यांची मुलगी नाही. पण ती अशोक सराफांना पप्पा म्हणते. असं का? याचं उत्तर सायलीने दिलं.

अभिनेत्री सुलेखा तळवलकर यांनी आपल्या युट्यूब चॅनलसाठी नुकतीच सायलीची मुलाखत घेतली. या मुलाखतीत सायली अशोक पप्पांबद्दल भरभरून बोलली. आत्ताार्यंतच्या करिअरमध्ये तुला खूप लोक अशी भेटली असतील ज्यांच्याकडून तुला खूप काही शिकायला मिळालं असेल, अशी काही नावं सांगशील? असा प्रश्न सुलेखा यांनी सायलीला विचारला. यावर सायलीनं आवर्जुन अशोक सराफांचं नाव घेतलं. तिने त्यांचा उल्लेख अशोक पप्पा असा केला.ती म्हणाली, ‘अशोक सराफांचं नाव घेतलं नाही तर माझ्या म्हणण्याला पूर्णत्वच येणार नाही. कारण त्यांची मानलेली मुलगी मी आहे. काहे दिया परदेस त्यांनी बघितली होती सुरूवातीपासून आणि तेव्हाच त्यांनी त्यांच्यात्यांच्या मनात हे ठरवून टाकलं होतं की मला मुलगी हवी ती अशीच. त्यांची मानलेली मुलगी असल्यामुळे त्यांच्याकडून मला खूप गोष्टी शिकायला मिळतात. माझे सर्वांत मोठे टीकाकार आणि मार्गदर्शक अशोक पप्पा आहेत. कारण माझं प्रत्येक काम बघून,अगदी प्रत्येक मुलाखत बघून ते मला फोन करतात आणि हे तू चुकीचं बोललीस, हे तू चुकीचं वागलीस, असं मला सांगतात. माझे वडील इतकं लक्ष देत नव्हते माझ्या कामावर तितके अशोक पप्पा देतात. कुठेही  इकडचं तिकडे झालं असेल, कुठे माझ्या वागण्यात चुकलं असेल तर ते मला फोन करून सांगतात की असं करू नकोस हं. हे करू नकोस, हे कर. काहे दियाच्या वेळी आम्ही भेटलो नव्हतो. पण त्यानंतर एका सिनेमाच्या म्युझिक लॉन्च आमची भेट झाली आणि त्यानंतर तर... माझा फोन नंबरही त्यांना पाठ आहे. त्यांना मी काय शिकतेय, काही शिकलीये, हेही सगळं माहित आहे. सगळ्या गोष्टी त्यांना माहित आहे. निवेदिता सराफ..ती सुद्धा माझ्यासाठी कायम आहेत....’

तू मला पप्पा म्हण...मी अशोक सराफांना भेटेल किंवा मग त्यांना एकदिवस पप्पा म्हणू शकेल, अशी मी कधी कल्पनाही केली नव्हती. ते मला एकदा म्हणाले, काय म्हणशील तू मला? मी म्हटलं, काय म्हणू? यावर तू मला पप्पा म्हण. कारण तू बाबांना बाबा म्हणतेस, मला पप्पा म्हण...असं ते म्हणाले.  या सगळ्यासाठी भाग्य लागतं. त्यांची भेट होणं, त्यांनी मला मुलगी माननं यासाठी नक्कीच भाग्य लागतं, असं सायली म्हणाली.

टॅग्स :सायली संजीवअशोक सराफमराठी अभिनेता