Join us

"१० वर्षांपूर्वी आम्ही पहिल्यांदा भेटलो होतो पण...", वर्षा उसगावकर यांच्या लग्नाची गोष्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 16, 2024 08:00 IST

Varsha Usgaonkar : लोकमत फिल्मीच्या नो फिल्टर शोमध्ये वर्षा उसगांवकर यांनी त्यांच्या लग्नाबद्दल सांगितले. त्यांचे लव्ह मॅरिज नसून अरेंज आहे, असेही त्यांनी सांगितले.

मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे वर्षा उसगांवकर (Varsha Usgaonkar). उत्तम अभिनयशैली आणि सौंदर्य यांच्या जोरावर वर्षा उसगांवकर यांनी रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजविले आहे. आजही त्यांची लोकप्रियता कमी झालेली नाही. वर्षा उसगांवकर यांनी नुकतेच लोकमत फिल्मीच्या नो फिल्टर शोमध्ये हजेरी लावली. त्यावेळी त्यांनी करिअर, इंडस्ट्रीतील किस्से अशा बऱ्याच गोष्टींचा खुलासा केला. 

लोकमत फिल्मीच्या नो फिल्टर शोमध्ये वर्षा उसगांवकर यांनी त्यांच्या लग्नाबद्दल सांगितले. त्यांचे लव्ह मॅरिज नसून अरेंज आहे, असेही त्यांनी सांगितले. खरेतर त्यांना लवकर लग्न करायचे नव्हते. त्यामुळे त्यांच्या दोन लहान बहिणींची लग्न त्यांनी आधी करुन द्या असे आई वडिलांना सांगितलं. त्यांचं लग्न झाल्यानंतर घरातल्यांनी त्यांनाही आता लग्न कर असे सांगितले. मग त्यांनी मनावर घेतलं आणि लग्न करायचे ठरविले. त्यासाठी घरातल्यांनाच मुलगा बघायला सांगितला, असे त्यांनी मुलाखतीत सांगितले. 

आमचं प्रॉपर अरेंज मॅरिज झाले...

त्या म्हणाल्या की,  माझ्या आई वडिलांचं असं मत होतं की, गोव्याला हिचं लग्न केले तर हिचं करिअर स्वीकारतील का आणि हिला कलेची इतकी आवड आहे. तिला इंडस्ट्री सोडून दे, असे त्यांना सांगावसे नाही वाटले. हिचे लग्न कलेच्या घराण्यातच व्हावे. संगीतकार रवी यांचा एकुलता एक मुलगा अजय शर्मा यांचे स्थळ त्यांनी शोधून काढलं. त्यावेळी आमचं प्रॉपर अरेंज मॅरिज झाले. 

लग्नाच्या १० वर्षांपूर्वी आमची भेट झाली होती...

काय योगायोग आहे, आमच्या लग्नाच्या १० वर्षांपूर्वी आमची भेट झाली होती. त्यांनी मला एका चॅनेल ४ लंडनच्या चॅनेलसाठी लावणीसाठी मला साईन केले होते. हे गाणं उत्तरा केळकर यांनी गायले होते. या गाण्याची निर्मिती माझ्या नवऱ्याने केली होती. सुबल सरकार यांनी कोरियोग्राफ केलं होतं. त्यावेळी आमची ओळख झाली. पण आम्ही प्रेम किंवा लग्न या दृष्टीने पाहिलंच नाही. १० वर्षांनंतर तेच स्थळ आलं तेव्हा त्याच्या बहिणी आणि वडील म्हणाल्या की तेव्हाच लग्न करायला काय झालं होतं. ते नॉर्थ इंडियन आहेत.

माझ्या सासऱ्यांनी आणि नवऱ्यांनी माझ्या करिअरला कधीच विरोध केला नाही. जसा लग्नाच्या आधी माझे करिअर सुरू होते तसेच ते अविरत सुरू राहिले, असे वर्षा उसगांवकर यांनी सांगितले.  

टॅग्स :वर्षा उसगांवकर