Join us

पत्त्यांचा डाव, 'राणादा'चा रांगडा अंदाज अन्...; हार्दिक जोशीच्या 'क्लब ५२'चा टीझर प्रदर्शित

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 22, 2023 17:40 IST

हार्दिक 'क्लब ५२' या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकताच या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित करण्यात आला आहे. 

'तुझ्यात जीव रंगला' मालिकेतून घराघरात पोहोचलेला अभिनेता म्हणजे हार्दिक जोशी. या मालिकेतील त्याने साकारलेली राणादा ही भूमिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली. पहिल्याच मालिकेने हार्दिकला लोकप्रियतेच्या शिखरावर नेऊन ठेवलं. त्यानंतर हार्दिक अनेक मालिका आणि चित्रपटांत विविधांगी भूमिका साकारताना दिसला. आता हार्दिक 'क्लब ५२' या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकताच या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित करण्यात आला आहे. 

'क्लब ५२' या चित्रपटामध्ये हार्दिक जोशी मुख्य भूमिकेत दिसणार आहे. एका वेगळ्या भूमिकेतून हार्दिक पुन्हा एकदा त्याचा रांगडा अंदाज घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या चित्रपटाच्या टीझरमध्ये त्याची झलक पाहायला मिळत आहे. या चित्रपटाच्या नावानुसारच टीझरमध्ये क्लबमधील काही सीन दाखविण्यात आले आहेत. यामध्ये पत्त्यांचा खेळ सुरू असल्याचं दिसत आहे. पत्यांच्या जुगारावर आधारित या चित्रपटाची कथा आहे. टीझरमध्ये हार्दिकचे अॅक्शन सीन्सची झलकही पाहायला मिळत आहे. 

हार्दिकबरोबरच या चित्रपटात भाऊ कदम महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. टीझरमध्ये त्याची झलक पाहायला मिळत आहे. अमित कोळींचं दिग्दर्शन असलेल्या 'क्लब ५२' चित्रपटाची निर्मिती वैशाली ठाकूर यांनी केली आहे. येत्या १५ डिसेंबरला हा चित्रपट सर्वत्र प्रदर्शित होणार आहे. 

टॅग्स :हार्दिक जोशीमराठी चित्रपटमराठी अभिनेता