अभिनेते अशोक सराफ (Ashok Saraf) आणि अभिनेत्री निवेदिता सराफ (Nivedita Saraf) मराठी कलाविश्वातील लोकप्रिय जोडपे आहे. त्या दोघांनी सिनेसृष्टीत विविधांगी भूमिका साकारुन रसिकांच्या मनात घर केले आहे. सध्या दोघेही मालिकेत काम करताना दिसत आहेत. अशोक सराफ कलर्स मराठी वाहिनीवरील 'अशोक मा.मा.' मालिकेत तर निवेदिता सराफ स्टार प्रवाह वाहिनीवरील 'आई आणि बाबा रिटायर होत आहेत' या मालिकेत काम करताना दिसत आहेत. मात्र तुम्हाला माहिती आहे का, या जोडप्याला एक मुलगा आहे, अनिकेत (Aniket Saraf). जो सिनेइंडस्ट्रीऐवजी वेगळ्या क्षेत्रात कार्यरत आहे. खरंतर आज त्याचा वाढदिवस असून त्यानिमित्ताने निवेदिता सराफ यांनी फॅमिली फोटो शेअर करत त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
निवेदिता सराफ यांनी अशोक सराफ आणि अनिकेतसोबतचा परदेशातील व्हॅकेशन्समधला फोटो शेअर करत त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. त्यांनी लिहिले की, माझा प्रिय अनिकेत, तू माझ्यासोबत घडलेली सर्वात चांगली गोष्ट आहेस. आज तू ज्या प्रकारचा व्यक्ती बनला आहेस, त्याबद्दल मला तुझा खूप अभिमान वाटतो. तुझा संयम, दयाळूपणा, तुझी आंतरिक शक्ती, त्या प्रेमाबद्दल मी तुझे खूप कौतुक करते. वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. या पोस्टवर सेलेब्ससोबत कलाकार मंडळी वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना दिसत आहेत.
अनिकेत सराफ सिनेइंडस्ट्रीपासून दूर आहे. त्याला अभिनयात, दिग्दर्शनात किंवा चित्रपटाची निर्मिती करण्यात अजिबातच रस नाहीये. तो वेगळ्याच क्षेत्रात कार्यरत आहे. तो शेफ असून परदेशात स्थायिक आहे. त्याला विविध पदार्थ बनवण्याची सुरुवातीपासूनच आवड होती. आपली आवड लक्षात घेऊन त्याने आपले करिअर बनवलं आहे. त्याचं शिक्षण फ्रान्समध्ये झालंय. तो भारतीय आणि पाश्चिमात्य दोन्ही प्रकारचे पदार्थ बनवतो. अशोक सराफ यांना त्याने बनवलेली ब्राउनी खूप आवडतात. तर आई निवेदिता सराफ यांना मुलाच्या हातचा मार्बल केक आवडतो.