Join us
Daily Top 2Weekly Top 5

"मी स्वामींना नेहमी सांगते की.."; तेजस्विनी पंडितने सांगितला समर्थांच्या मठात गेल्यानंतरचा भावुक अनुभव

By देवेंद्र जाधव | Updated: July 18, 2025 13:36 IST

तेजस्विनी पंडितने स्वामी समर्थांबद्दल खास अनुभव सर्वांसोबत शेअर केला आहे. ती स्वामी समर्थांची किती मोठी भक्त आहे, हेच यावरुन दिसून येतं.

तेजस्विनी पंडित ही मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री. तेजस्विनीला आपण विविध सिनेमात अभिनय करताना पाहिलंय. तेजस्विनी स्वामी समर्थांची मोठी भक्त आहे. तेजस्विनीने सुमन मराठी म्यूझिक या युट्यूब चॅनलला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं की, "खूप जणं आहेत जी कुठल्यातरी मंदिरात गेलेत आणि देवाला बघून घळाघळा रडलेत. खूप वेळेला हे होतं आणि मलाही अनेकवेळेला असं झालंय की, कळतच नाही त्या क्षणाला, का असं होतंय, का रडू येतंय? पण खूप पाणी आणि नुसतं पाणी वाहत असतं."

"तुमचं उत्तर आणि तुमची शांतता हे कोणाला कशामध्ये सापडेल ना हे सांगता येत नाही. मला स्वामी समर्थांच्या मंदिरात गेल्यावर इतकं शांत वाटतं. इतकं घळाघळा रडायला येतं. कधीकधी हनुमानाच्या मंदिरामध्ये गेल्यावर पण माझी अशी अवस्था असते. त्यामुळे दरवेळेस एखादा थेरपिस्ट लागतो, एखादा लाईफ कोच लागतो असं काही नाहीये. तुमचं उत्तर किंवा त्या क्षणाला तुम्हाला कशाची गरज आहे हे त्या क्षणाला जरी नाही सुचलं, तरी त्याक्षणी सरेंडर करुन टाकलं ना, तरी खूप होतं. आता जे होईल ते तू सांभाळून घे असं मी स्वामींना नेहमी सांगत असते."

"आता ही परिस्थिती आहे, मी तुमच्यावर सोडतेय, तुम्ही जे कराल ते. ठीकेय, म्हणजे तुम्ही माझ्या आयुष्यात जी घटना घडवून आणली आहे त्या घटनेतून कदाचित तुम्ही मला शिकवण देण्याचा प्रयत्न करत आहात तर मी ते शिकते. आणि याच्यापुढे मला माझ्या आयुष्यापुढे काय करायचं आहे ते तुम्ही करा. तुम्ही माझी काळजी घ्या, असं म्हणत मी कधीकधी त्यांच्यावरती सगळं सोडून देते." अशाप्रकारे तेजस्विनी पंडितने तिचा अनुभव शेअर केला आहे. 

टॅग्स :श्री स्वामी समर्थतेजस्विनी पंडितबॉलिवूडमराठी चित्रपट