'वडापाव' सिनेमा(Vadapav Movie)चा ट्रेलर रिलीज झाल्यापासून या चित्रपटाची प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता निर्माण केली होती. त्यात आता या चित्रपटाचा धमाकेदार ट्रेलर रिलीज झाला आहे. कॉमेडी, भावनिक क्षण आणि नातेसंबंधांवर विचार करायला लावणारा हा सिनेमा प्रेक्षकांसाठी भन्नाट मेजवानी ठरणार आहे. त्यामुळे 'वडापाव' हा केवळ चित्रपट नसून, सगळ्यांच्या नात्यांची आणि भावनांची गोड–तिखट चव अनुभवायला लावणारा प्रवास ठरणार आहे.
'वडापाव' ट्रेलरमधून कौटुंबिक नात्यांचे गोड–तिखट वळणं, हास्याची खमंग फोडणी आणि भावनिक प्रसंगांचा स्पर्श प्रेक्षकांच्या मनाला भिडतो. सिनेमागृहात प्रेक्षकांना हसवतानाच काही क्षण डोळ्यात पाणी आणणारा हा सिनेमा नातेसंबंधांबद्दल नव्याने विचार करायला भाग पाडतो, हे ट्रेलर पाहूनच जाणवतं.
दिग्दर्शक प्रसाद ओक म्हणाले, '''वडापाव' म्हणजे प्रत्येक घराघरातल्या नात्यांची आणि भावनांची चव आहे. नाती जशी गोड–तिखट असतात, तसाच या सिनेमातला प्रत्येक क्षण आहे. ट्रेलरला मिळालेला भरघोस प्रतिसाद पाहून मला खात्री आहे की, चित्रपट प्रेक्षकांना केवळ हसवणार नाही तर डोळ्यांत पाणी आणून नातेसंबंधांबद्दल नव्याने विचार करायलाही भाग पाडेल. रितेश देशमुख यांच्या उपस्थितीमुळे ट्रेलर लाँच सोहळा अविस्मरणीय झाला आणि आमचं मनोबलही दुणावलं.''
प्रसाद ओक दिग्दर्शित 'वडापाव' या चित्रपट एबी इंटरनॅशनल फिल्म्स एलएलपी, मर्ज एक्सआर स्टुडिओ, व्हिक्टर मुव्हीज लिमिटेड, अमेय विनोद खोपकर एंटरटेनमेंट आणि मोहसीन खान प्रस्तुत, सिनेमॅटिक किडा बॅनरअंतर्गत हा चित्रपट निर्मित झाला आहे. निर्माते अमित बस्नेत, प्रजय कामत, स्वाती खोपकर आणि निनाद नंदकुमार बत्तीन असून सहनिर्माते तबरेझ एम. पटेल आणि सानीस खाकुरेल आहेत. छायाचित्रण दिग्दर्शक संजय मेमाणे तर लेखन सिद्धार्थ साळवी यांनी केलं आहे. 'वडापाव' या चित्रपटात प्रसाद ओक, अभिनय बेर्डे, गौरी नलावडे, रसिका वेंगुर्लेकर, शाल्व किंजवडेकर, रितिका श्रोत्री, समीर शिरवाडकर, सिद्धार्थ साळवी, अश्विनी देवळे-किन्हीकर आणि सविता प्रभुणे यांच्या भूमिका आहेत. येत्या २ ॲाक्टोबर रोजी प्रेक्षकांना या 'वडापाव'ची चव चाखता येणार आहे.