'बिग बॉस मराठी ५'चा विनर आणि सोशल मीडिया स्टार सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. या सिनेमाच्या ट्रेलरलाही प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. सिनेमा रिलीज होण्याआधीच त्यातील 'झापुक झुपूक' हे गाणं मात्र सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झालं आहे. या गाण्यावर अनेक रील व्हिडिओही चाहते बनवत आहेत. सूरजच्या या गाण्याची इतकी क्रेझ आहे की आयपीएल सामना सुरू असताना वानखेडे स्टेडियमवरही हे गाणं वाजलं.
रविवारी वानखेडे स्टेडियमवर आयपीएलमधला मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज सामना पार पडला. क्रिकेटर्सने त्यांच्या खेळीने हा सामना अटीतटीचा करत रंगत आणली. पण, वानखेडेवर लागलेल्या सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' या गाण्यानेही क्रिकेटप्रेमींचं मनोरंजन केलं. मुंबई विरुद्ध चेन्नईचा सामना सुरू असताना स्टेडियमध्ये 'झापुक झुपूक' गाणं वाजलं. आणि या गाण्यावर थिरकण्याचा मोह क्रिकेटप्रेमींना आवरता आला नाही. याचा व्हिडिओ समोर आला आहे.
दरम्यान, सूरज चव्हाणचा झापुक झुपूक सिनेमा येत्या २५ एप्रिलला प्रदर्शित होतो आहे. केदार शिंदेंनी या सिनेमाचं दिग्दर्शन केलं आहे. या सिनेमात जुई भागवत, इंद्रनील कामत, हेमंत फरांदे,पायल जाधव,दीपाली पानसरे, पुष्कराज चिरपुटकर, मिलिंद गवळी अशी स्टारकास्ट आहे.